Skip to main content
Narrative ChangeYUVA

#YUVA35: YUVA Meri Nazar Mein Part 5

By September 14, 2019December 24th, 2023No Comments

We are back with the fifth part of YUVA Meri Nazar Mein and this last instalment definitely promises more reflections and more experiences.

युवा संस्थेचा आणि माझा एक ऋणानुबंध आहे. आज या ऋणानुबंधाची जाणीव बाळगून युवामधील माझ्या कार्यसहभागाविषयी हे लिखाण करत आहे. सदर लिखाण हे काळ आणि व्यक्ती सापेक्ष असल्यामुळे आजच्या काळातील वाचकांना गतकाळातील व्यक्तींच्या अनुभवाचे वाचन करण्यापेक्षा जास्त काही मिळेल असे मला वाटत नाही. पण युवाला ३५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने माजी कार्यकर्त्यांना लिहितं करण्याचा उपक्रम स्तुत्य वाटला आणि युवा संस्थेबरोबर असलेल्या ऋणानुबंधाची जाणीव घट्ट असल्यामुळे सदर लिखाण केलं आहे.

 सन १९८४ मध्ये दादर सारख्या सुखवस्तू भागातून माझे कुटुंब जोगेश्वरी मधील रामवाडी या झोपडपट्टीत राहायला आले. मी तेव्हा आठवी पास झालेलो. वडिलांची दारूच्या व्यसनामुळे नेव्हल डॉकमधील अधिकारीपदाची नोकरी सुटली होती. आई शिक्षिका असल्यामुळे कसंबसं निभावलं जात होतं पण ते पुरेसं नसल्यामुळे खूपच ओढाताण व्हायची. झोपडपट्टीतील जीवनाची ओळख नसल्यामुळे आम्ही सगळेच एका निराश मानसिकतेमधून जात होता. पुढील दोन वर्ष त्या वातावरणात अतिशय हलाखीची गेली. रात्रशाळेत शिकून दिवसा मिळेल ते काम करून मी कुटुंबाला थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न केला. या परिस्थितीत दहावी उत्तीर्ण होता आले नाही आणि करिअर उभारणीचा एक सरळ मार्ग बंद झाला. खूप वेळ रिकामटेकडा जाऊ लागला. शिकलेल्या आणि विवेकवादी घरातील असल्यामुळे सारासार विचार करता यायचा म्हणून रिकामटेकड्या वेळात शिवजयंती, दहीहंडी, कबड्डी सामने, गणपती रंगविणे अशा चांगल्या गोष्टींमध्ये मन रमवायचो. आजूबाजूच्या तरूणासोबत नवशक्ती क्रीडा मंडळाची स्थापना केली होती. पण त्याने आयुष्याला दिशा मिळेल असा विश्वास मात्र मिळत नव्हता. आणखी एक गोष्ट म्हणजे त्याकाळात झोपडपट्टीत गुंड,राजकारणी आणि धार्मिक कट्टरता पसरवणाऱ्याचं खूपच प्रस्थ होतं. रिकामटेकडे तरुण सहज यांच्या सान्निध्यात येऊन भरकटत जायचे. मी अशा कोणत्याही मार्गावर गेलो नाही याबद्दल आज विचार केला तर खूप बरं वाटतं.

 अशावेळी सन १९८६ मध्ये कोणीतरी मला युवा संस्थेने आयोजित केलेल्या आंतरमुंबई शांती महोत्सव नावाच्या कार्यक्रमाला नेलं. दिवसभर मी त्या महोत्सवातील विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला. मुंबईतील विविध भागातून माझ्यासारखे शेकडो तरुण आणि तरुणी त्या महोत्सवात सहभागी झाल्या होत्या. मी आयुष्यात पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या तरुण — तरुणींमध्ये वावरलो. खूप मजा आली, बरं वाटलं ! आणी आपण तरुण आहोत, आपल्याही काही जबाबदाऱ्या, इच्छा — आकांक्षा, स्वप्न, महत्वाकांक्षा असू शकतात यावर मनात विचार सुरू झाला. सामाजिक आशयाची गाणी व खेळ तसेच शांतता, स्त्री — पुरुष समानता, व्यसनमुक्ती युवकांचे सामर्थ्य याविषयी झालेली भाषणं यामुळे आपण एका वेगळ्या विश्वात दिवसभर वावरलो याचं एक समाधान मिळालं. पण सर्वात जास्त काही आवडलं ते म्हणजे युवाच्या मिनार पिंपळे यांचं व्यक्तिमत्व ! एक गोरागोरा पान, सुदृढ आणि एकाच वेळी हिंदी — मराठी — इंग्रजी भाषांमध्ये प्रभावीपणे आणि ज्ञानसंपन्न आशय मांडणारा तरुण मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. त्याच्या व्यक्तिमत्वाची भुरळच पडली जणू ! मिनारचं बोलणं ऐकुन जीवनात एक आशेचा किरण डोकावला. त्याचे विचार सतत ऐकावे म्हणून अशा पुढील कितीतरी कार्यक्रमांना मी उपस्थित राहू लागलो. तरुणांच्या पुढाकारातून नव्या आणि आदर्श समाजाची निर्मिती करण्याचं स्वप्न मिनारच्या बोलण्यातून व्यक्त व्हायचं. हे तर तो आपल्या मनातलच काहीतरी इतक्या आत्मविश्वासाने बोलतो याचं अप्रूप वाटायचं. प्रत्येक कार्यक्रमानंतर मिनारशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करायचो आणि त्यामधून आपल्याला असाच विचार करता येतो का ते पडताळून पहायचो. युवा संस्थेने आयोजित केलेल्या तरुणांच्या सर्वांगीण विकासाच्या अशा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत गेल्यामुळे सुसंगत विचार, न्याय — अन्याय, परिस्थितीचे विश्लेषण करण्याची क्षमता वाढीस लागली.

 मला वाचनाची खूप आवड होती जी युवाने स्थापन केलेल्या युवा केंद्रातील वाचनालयामुळे जपता आली. विज्ञान, जाती विषमता निर्मूलन, धार्मिक सलोखा, स्त्री — पुरुष समानता अशा जीवनावश्यक गोष्टींचे संस्कारही या वाचनातून आणि युवाच्या कार्यक्रमांतून माझ्यावर होत गेले. समाजातील आपण आणि इतर सर्वसामान्य माणस भोगत असलेल्या समस्या या शासनव्यवस्थेच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झालेल्या आहेत याची जाणीव होत गेली. म्हणून झोपडपट्टीतील लोकांच्या हक्कांचे प्रश्न माझे आहेत असे मानून त्याबद्दल आवाज उठविणाऱ्या लोकशाही पद्धतीच्या निषेध कार्यक्रमांमध्येही पुढाकार घेऊ लागलो. जोगेश्वरी पूर्व मध्यवर्ती समिती, ब्ल्यु स्टार आणि मुंबई पातळीवरील विधायक युवा संघटना अशा संघटनांच्या मोर्चे आणि निदर्शनांमध्ये कायम सहभागी व्हायचो.

चळवळीची गाणी म्हणनं, सामाजिक आशयाच्या चर्चांमध्ये मुद्देसूद बोलण, तरुणांना एकत्र आणण या समाजिक कार्यकर्त्याला लागणाऱ्या कौशल्यांना हळूहळू आत्मसात केल्यामुळे आपणही मिनार पिंपळेसारखं काम करू शकतो अशी भावना वाढीस लागली. आणि पुढे मिनारबरोबर याविषयी झालेल्या चर्चेमधून युवासाठी मानधन घेऊन काम करण्यास सुरुवात झाली. आयुष्याला एक निर्णायक वळण मिळाले. शाश्वती नसली तरी पहिल्यापेक्षा कितीतरी चांगलं जगता येण्याचं समाधान मिळाल. युवामध्ये खूप चांगली माणस भेटत गेली, त्यांच्याकडून शिकता आलं. युवामध्ये काम करणाऱ्या प्रकाश कांबळे यांनी लिखाण सुधारायला खूप मदत केली. त्यामुळे आजही पेपरमध्ये कार्यक्रमाची बातमी छापायला पाठवली तर छापणाऱ्याना त्यात एडिटिंग करायला वावच नसतो. युवाच्या आंतर मुंबई पातळीवरील युवकांच्या संघटना बांधणीच्या कामात मी मुख्यत: सहभागी होतो. मोहन सुर्वे त्यावेळी माझा वरिष्ठ सहकारी होता. मुंबईतील कामाठीपुरा, विक्रोळी पार्कसाईट, धारावी, मालवणी अशा काही झोपडपट्टी व कामगार वस्त्यांमधील तरुण — तरुणींना एकत्र आणून समाजातील अन्याय्य गोष्टींविषयी आवाज उठविण्यासाठी त्यांना प्रेरित करणे हे माझ काम होत. त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी युवाचा प्रमुख म्हणून मिनार पिंपळे कायम पाठींबा द्यायचा. मिनारची उपस्थिती आणि कार्यक्रमाला लागणारे पैसे याबाबत मिनारने आश्वस्त केले असल्यामुळे बाकीच्या गोष्टी मोहन आणि मी उत्साहाने जुळवून आणायचो. मी सन १९९० मध्ये युवाचा राजीनामा देईपर्यंत हा अनुभव कायम राहिला. यादरम्यान, युवा संस्थेने माझ्यासारख्या सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या पण एम. एस. डब्ल्यू. सारखी डिग्री नसणाऱ्या तरुणांना समाज कार्याचं प्रशिक्षण देणारा ‘शहरी चेतक प्रशिक्षण’ कोर्स सुरु केला. त्या कोर्सच्या पहिल्या Batch चा मी एक विद्यार्थी होतो. या प्रशिक्षणाने मला समाजकार्याकडे व्यावसायिक पद्धतीने पाहण्याची दृष्टी दिली.

मिनार पिंपळे हा सार्वत्रिक जीवनात एक प्रभावी व्यक्तिमत्व एवढंच नसून माझ्या बाबतीत व्यक्तिगत पातळीवरही एक सज्जन माणूस म्हणून राहिला. माझ अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यसाठी त्याने प्रोत्साहन दिले. युवातील कार्यकर्ती, अल्पा व्होरा आणि मिनारच त्यावेळी नुकतच लग्न झालं असतानाही त्या दोघांनी आपापल्या आई — वडिलांकडे राहून मला आणि मोहनला अभ्यास करण्यासाठी निवांतपणा मिळावा म्हणून अंधेरीतील घरामध्ये राहू दिले. युवामधून बाहेर पडून मी माझे एम.एस.डब्ल्यू. शिक्षण पूर्ण केले तरी त्याला बळ मात्र मिनारने त्यावेळी केलेल्या अशा मदतीमधूनच मिळाले.

युवामध्ये असताना घडलेली आणखी एक आणि सर्वांत महत्वाची घटना म्हणजे जयश्री! युवाच्या महिला सबलीकरणाच्या कामात जयश्री सहभागी होती. जयश्रीबरोबर माझे वैवाहिक जीवन जुळून येण्याचा योगही युवा संस्थेत असल्यामुळे आला. माझ्याप्रमाणेच जयश्रीची जडणघडण एका कार्यकर्तीच्या पातळीवरील असल्यामुळे आजही आम्ही दोघं वैवाहिक जीवनात एकत्रितपणे सगळ्या चांगल्या — वाईट परिस्थितीला सामारे जाण्याचे सामर्थ्य बाळगतो. युवा संस्थेच्या सान्निध्यात असतानाच्या काळात माझ्यासारखे इतरही अनेक तरुण — तरुणी संपर्कात आले. त्यांच्याही जीवनात स्वत:च आयुष्य समर्थपणे उभं करण्याच्या प्रेरणा युवामुळे निर्माण झाल्याचं मी पाहिल. त्यापैकी अनेक जण आजही माझे चांगले मित्र आहेत. अनिल इंगळे आजही युवा संस्थेत कार्यरत आहे. संजय शिंदे आज पत्रकार असला तरी सामाजिक चळवळीमध्येच जास्त सहभागी असतो. मोहन सुर्वे विकास सहयोग प्रतिष्ठानसारख्या एका मोठ्या संस्थेचा प्रमुख आहे. भरत कंथारिया सुरतमध्ये बालहक्क संरक्षणासाठी काम करतोय. माझी वर्गमैत्रीण, लिझा जॉन तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेत काम करतेय. आज मी स्वतः सृष्टीज्ञान संस्थेचा प्रमुख म्हणून करीत असलेले कामही युवामध्ये मिळालेल्या प्रेरनांचेच पुढचे पाऊल आहे.

माझ्या सामाजिक क्षेत्रातील वाटचालीची बीज युवा संस्थेने १९८६ मध्ये रोवली आणि मिनार पिंपळेनी त्याला वैचारिक प्रगल्भतेच खतपाणी घातलं. हा ऋणानुबंध आज युवा संस्थेच्या ३५ वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने आठवून लिहिता आला याचं मला खूप समाधान वाटत. युवा संस्थेला माझ्यासारख्या अशा अनेकांच्या जीवनात प्रेरणा बनून राहण्याच्या कार्यासाठी मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो.

Prashant Shinde, Former Staff, YUVA

अजुन ‘युवा’च

१९८५ या आंतरराष्ट्रीय युवा वर्षानिमित देशभरात ज्या युवा संघटना चळवळी उभ्या राहिल्या त्यापैकी अद्यापही भक्कमपणे टिकून राहिलेली आणि काळाच्या ओघात स्थिरावत, विस्तारत गेलेली मोलाचा दगड ठरलेली संस्था म्हणजे ‘युवा’.

मिनार पिंपळे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी गिरगावच्या केवळ १० बाय १० च्या घरातून सुरू केलेली ही संस्था आज जगभरातले प्रश्न कवेत घेऊन उभी आहे. मी स्वतः आणि लोकांचे दोस्त संघटनेतील अनेकांची वाटचाल युवाबरोबर समांतर होत राहिली. युवाला संस्थात्मक मर्यादा होत्या तर लोकांचे दोस्त यांना आयुष्याच्या मर्यादा होत्या. मात्र आज ३५ वर्षानंतरही या दोन्हीही संस्था युवाच आहेत. भाजपविरुद्ध भारतीय ही भूमिका घेऊन लोकांचे दोस्त सत्तेला आवाहन देत आहे तर युवा संस्था व्यवस्थेच्या ढाचा बदलणारी यंत्रणा उभारण्याच्या प्रयत्नात. एखाद्या जंक्शन वरच्या दोन्ही गाड्या काही काळाकरीता एकत्र येतात आणि पुन्हा आपल्या मार्गाने वाटचाल करू लागतात. आज ३५ वर्षानंतर एक मुद्दा मात्र टोचत राहतो. या दोघांनीही सुरुवाती पासूनच एक राजकीय भूमिका घेतली असती तर आजच्या राजकारणात काही वेगळे चित्र असते. असो, सगळ्याच संस्था संघटनांनी ही सुरुवात करायला हवी कारण अजून आपण युवाचं तर आहोत.

Ravi Bhilane, Member, Lokanche Dost

युवाबद्दल आम्हाला पूर्वी माहिती नव्हती, पण ज्यावेळी युवाबद्दल आम्हाला माहित पडले तेव्हा आम्हाला समजले की, असंघटित क्षेत्रातील लोकांना संघटित करण्यामध्ये युवाचा फार मोठा वाटा आहे. १९९८ मध्ये खोत मैडम आमच्याकडे आल्या होत्या आणि त्या युवामध्ये कार्यरत आहेत असे आम्हाला माहित पडले. त्यावेळी त्यांनी नाका कामगारांना ‘कामगार ओळखपत्र’ बनवून देण्यासाठी मोठे काम केले. अनेक लोकांना त्यांनी ते ओळखपत्र मिळवून दिले. नाका कामगारांकडे कोणतेही पुरावे नसताना त्यांनी पुरावे तयार करून दिले. खोत मैडम यांनी आम्हाला रेशन कार्ड सुद्धा मिळवून दिले. त्यावेळी आमच्या लक्षात आले, युवा ही एक चांगली आणि खरी संस्था आहे. आमच्या अपेक्षा युवाकडून पूर्ण होतील असा विश्वास निर्माण झाला. आज आम्ही बेघर आहोत आणि घर हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष हिरामण पघार सर युवासोबत जोडलेले आहेत. भविष्यात युवा आणि घर हक्क संघर्ष समिती यांच्याकडून आम्हाला घर मिळावे हीच एक अपेक्षा आहे.

Dilip Chavan, Community Member, YUVA

युवाला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. युवाच्या स्थापनेपासून आजवर ज्यांचा ज्यांचा युवाच्या घडणीत सहभाग राहिला त्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

युवाच्या प्रत्यक्ष कामात मी नसलो तरी सहकार्याने करावयाच्या कामात अनेक वेळा माझा संबंध राहिला आहे. एकप्रकारे मी युवाचा सहप्रवासी राहिलो आहे.

मी मूळात पुरोगामी राजकीय कार्यकर्ता आहे. एनजीओ प्रकाराकडे आम्ही राजकीय कार्यकर्ते तसे संशयाने पाहणारे, परंतु युवाचे वेगळेपण हे तिच्या स्थापनेपासूनच लक्षात आले. समाजातील कष्टकरी, शोषित, पीडित विभागांत कल्याणकारी नव्हे, तर त्यांना त्यांच्या अधिकारांची / हक्कांची जाणीव करुन देऊन त्यांना या व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी उभे करणे ही युवाची भूमिका मला महत्वाची वाटली. युवाशी मैत्री होण्यास युवाची ही भूमिकाच कारण ठरली.

याच भूमिकेतून काम करणाऱ्या ज्या रेशनिंग कृती समितीशी माझा प्रदीर्घ काळ संबंध राहिला, तिच्या प्रमुख संस्थापकांपैकी युवा आहे. जे दोन निमंत्रक प्रारंभी होते, त्यातील एक निमंत्रक युवा होती. रेशनिंग कृती समितीचे अनेक मोर्चे संघटित करण्यात, तिला दिशा देण्यात, महाराष्ट्रात तिचा विस्तार करण्यात युवाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. या लढ्याची एक फिल्मही त्या काळात युवाने तयार केली. युवाच्या पुढच्या फळीतीलही अनेक कार्यकर्त्यांच्या कार्यक्षेत्रात तसेच आघाड्यांवर मी रेशनच्या कामानिमित्त सतत जात राहिलो.

अलीकडे संविधानातील मूल्यांच्या तसेच पुरोगामी विचारसरणींच्या प्रचार-प्रसाराच्या कामात सत्रे घेणे, निदर्शने, परिषदा, यात्रा आदि मार्गांनी युवाशी सतत सबंध येत असतो. संविधानकारांनी रचलेला नवभारताचा पायाच उध्वस्त करण्याचे जोरदार प्रयत्न भोवताली होत असताना युवासारख्या सहकारी-मित्रांची ही सोबत, सहकार्य अधिकच आवश्यक झाले आहे. आपली ही सोबत व सहकार्य असेच सोबत राहो.

युवाच्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा!

Suresh Sawant, Expert, Indian Constitution

मेरा नाम उर्मिला जैसवार है, युवा के साथ 20 साल से जुडी. घर, नल, लाईट व्यक के साथ मिला. CRZ के लिए लड़ी नहीं हवा बचतगट के साथ जुडी, महिला मंडल के साथ कार्यक्रम लिए. मेरे दोनों बच्चे युवा के साथ जुड़कर बाल डॉक्टर बने, BASS में जुड़े. प्रगती बाल मंडल में जुड़े. राशी अविष्कार में जुड़े, बहुत जानकारी मिली, सोच बदली, पहिले डर डर के बोल नहीं पाते थे.

Urmila Jaiswar, Community Member, YUVA

जॉर्ज ऑरवेलची 1984 ही कादंबरी 50 वर्ष आधीची पण त्यांनी कादंबरीत केलेले भाकीत जवळपास खरे होत आलेल्या काळात युवाचा जन्म ! म्हणून युवाचे अजून महत्व !! त्याला धरुन बरेच महत्वाचे उपक्रम युवाने राबवायचे प्रयत्न केले. मुख्यतः आदिवासी, दलित व महिला प्रश्नांवर फार चांगले काम केलेले आहे आणि तेही विदर्भात ! त्याच सुमारास ग्रामीण भागात बाबरी मस्जिद आणि राम मंदिर या मुद्द्याभोवती संपूर्ण समाजकारण, राजकारण केंद्रीत केल्यामुळे जवळपास सगळ्या परिवर्तनशील चळवळी बाजूला झाल्या. त्यावेळी संपूर्ण भारत त्यांनी इतक्या साधारण मुद्दयात अडकुन टाकला की, त्यावेळी विस्थापन, बेकारी, दलित आदिवासी, महिला, अल्पसंख्यांक या समुदायांचे सगळे प्रश्न दुय्यम झालेले दिसत होते. आजही समाजात परिस्थिती वेगळी असलेली दिसून येत नाही. त्यासाठी युवासारख्या संस्थेने गंभीरपणे विचार-विमर्श करुन आपली भावी वाट्चाल ठरवावी ही अपेक्षा व्यक्त करतो.

Suresh Khairnar, Social Activist

मी ज्यावेळी २००६ ला मुंबईला आलो, त्यावेळी सर्वप्रथम माझी आमच्या येथील महिला उषा जाधव यांच्याशी ओळख झाली. त्या संस्थेशी संलग्न काम करत असतांना युवा जी काम करत होती त्या कामाची ओळख झाली. . त्यावेळी असंघटित क्षेत्रातील लोकांबरोबर संस्था खुप छान पद्धतीने काम करत आहे, हे माझ्या लक्षात आले. पुढे २००९ पासून मी युवासोबत काम करत होतो आणि गेल्या ३ वर्षापूर्वी आम्ही घर हक्क संघर्ष समिती स्थापन केली. अशिक्षित लोकांना त्यांचे अधिकार आणि हक्क मिळावेत म्हणून युवा जो प्रयास करत आहे तो खरच कौतुकास्पद आहे. बदलत्या परिस्थितीनुसार युवा पुढे धावणारी संस्था नसून ती सर्वांना सोबत घेऊन जाणारी संस्था आहे. भविष्यात युवा आणि घर हक्क संघर्ष समिती एकत्रित येऊन चांगले काम नवी मुंबई शहरात करू शकतात. युवाला भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा.

Kailash Sarkate, Community member, YUVA

मी लक्ष्मी शिंदे, माझ्या नावाची ओळख ही माझ्या दूध वाटण्याच्या कामामुळे झाली. मी आगोदर घरोघरी जाऊन दूध देण्याचे काम करायचे त्यावेळी माझी ओळख अनुसया माने यांच्याशी झाली. काम करत असताना मी युवा संस्थेशी जोडली. मी युवाच्या मीटिंगमध्ये सुरुवातीला गाणी म्हणायचे. ही चळवळीची गाणी म्हणताना योगायोगाने पोटात दडलेले ओठावर यायचे. मी गेली २५ वर्ष महाराष्ट्रात प्रशिक्षणासाठी जात आहे, प्रत्येक प्रशिक्षणात गाण्यांचा मोठा वाटा आहे. चळवळीच्या गाण्यांनी मला एक उत्साह दिला. जास्तीत जास्त गाणी लोकांपर्यंत पोहचवून चळवळीला मजबुती मिळावी हाच युवाचा उद्देश होता. महिलांची ताकद हीच युवाची मोठी देणगी आहे. युवाने आम्हाला घडविले म्हणून आम्ही पुढे पुढे गेलो. हळूहळू स्त्री मंच संस्थेबरोबर काम केले. त्यानंतर महिलांच्या घरघुती हिंसेच्या केसवर पोलीसांसोबत काम केले. सोबतच, बचत गट वाढत गेले आणि फेडरेशन तयार झाले कारण गटातून त्यांच्या गरजा भागात नव्हत्या म्हणून फेडरेशन तयार केले. असे करता करता युवाच्या मार्गद्शनाखाली युवाने धारावीमध्ये आकांक्षा महिला नागरी सहकारी पतसंस्था निर्माण केली. आज मी स्रीमंच संस्थेची अध्यक्षा व आकांक्षा पतपेढीची उपाध्यक्षा म्हणून काम करत आहे. मला लिहिता येत नाही, पण बोलता चांगल्या प्रकारे येते ही ताकत माझ्यामध्ये युवाने रुजविली. एखाद्या वृक्षाप्रमाणे, बी पेरले की रोप हळूहळू येते, अगदी तसेच प्रशिक्षण युवाने मला दिले. आम्हा सर्व महिलांना जागृत केले, यामध्ये सिंहाचा वाटा युवाचा आहे.

मला घडवल या महान युवा संस्थेने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी…! माझा त्यांना मनाचा मुजरा.

मी सर्वासाठी एक घोषणा देते

नारी शक्ती आयी है,

नई रोशनी लाई है !!

हम सब एक है, हम सब एक है

जय हिंद जय महाराष्ट्र.

Lakshmi Shinde, Member, Dharavi Stree Manch

मै सविता कंवर युवा बाल वादी में ४ वर्ष की थी तभी जुडी, आज मै २६ साल की हु. युवा का प्रगती बाल मंडल से हमने अलग अलग प्रशिक्षण लिए, BASS में माहिती प्रसारण मंत्री रही. स्वच्छता कार्यक्रम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर से लोगों के साथ स्वास्थ के बारे में जानकारी लिए और दिए. अभी मै आंगनबाड़ी सेविका हु और बच्चों के साथ युवा मै पिछले महिने से साथ में काम करती हु.

Savita Kanwar, Bal Adhikar Sangharsh Sangathan (BASS) leader

युवा संस्थे बाबत माझे अनुभव

युवा संस्थे मधील माझ्या सर्व मित्रांना नमस्कार.

३० ऑगस्ट २०१९ ला युवा संस्थेचा ३५ वा वर्धापन साजरा होत आहे. त्या निमित्य या संस्थे बाबत मी माझा अनुभव सांगत आहे.

युवा संस्थेने शेतकऱ्यांसाठी इन्साफ नावाचा प्रकल्प चालु केला होता. त्याच्या बैठकीचा कार्यक्रम माझ्या गावा मध्ये २००२ ला झाला आणि त्या कार्यक्रमाला मी हजर होते त्या वेळेस शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नव्हते. रसायनीत खताचे निविष्ठाचे भाव महाग असल्यामुळे व शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव कमी असल्यामुळे शेती करणे परवडत नव्हते. आणि रासायनिक खताचे व औषधीचे दुष्परिणाम या मुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या सुरु झाल्या आणि आज हि त्या चालु आहेत. परंतु त्यांच्या शाश्वत शेतीच्या १० तंत्रा मुळे मी आज शेती मध्ये यशो शिखर गाठू शकलो.

२००२ पासुन मी या संस्थे सोबत जुळलो तो प्रकल्प १० ते १२ वर्ष चालला त्या प्रकल्प पासून मला सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रेरणा मिळाली मी आजही १७ वर्ष झाले तरी पण यशस्वी पणे सेंद्रिय शेती करीत आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत शेती कृती परिषद नावाची शेतकऱ्याची संघटना स्थापन झाली त्या मध्ये मी अकोला जिल्हाचा अध्यक्ष म्हणुन काम केले.अनेक शेतकऱ्यांचा इन्साफ नावाचे प्रकल्पामध्ये जोडण्यात आले.त्यांचे शेतीचे सुमिंतर इंडिया ऑर्गनिक कंपनी मुंबई कडून प्रमाणीकरण करण्यात आले आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे एक चांगले संघटन निर्माण झाले आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातूनच २००६ मध्ये माझे स्वतःच्या जागे मध्ये सेंद्रिय धान्य विक्री केंद्र चालू केले ते अजूनहि चालू आहे. गेली १७ वर्षा पासून मी सेंद्रिय शेतीचा प्रचार,प्रसार व मार्गदर्शन विदर्भाच्या परिसरामध्ये शेतकरी मेळावे ,कार्यशाळा,वर्तमान पत्रातून, आकाशवाणी वरून, दूरदर्शनच्या अनेक वाहिन्या वरून, युट्यूब च्या माध्यमातुन करीत आहे.

इन्साफ प्रकल्प चालू असतांना माझ्या शेतीवर देशातील शेतकरी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, संशोधक व पत्रकार यायचे परंतु इतर देशाचे विद्यार्धी,संशोधक,व पत्रकार येवून गेले आहेत.आणि आजही माझ्या सेंद्रिय शेती प्रकल्पाला देशातील व इतर देशातील मान्यवरांच्या भेटी चालूच आहेत.

वरील सर्व कार्यक्रमाच्या बातम्या, फोटो, आजही माझ्याकडे उपलब्ध आहेत.सर्व कार्य करीत असतांना मला अनेक तालुका,जिल्हा,राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार,प्रशस्ती पत्र, सन्मान पत्र, शासनाचा सेंद्रिय शेती कृषी भूषण २०१४ ला मिळाला, २००९ मध्ये स्वामी नाथन रिसर्च सेंटर चेन्नई येथील फेलोशिप NVA मिळाली आहे. आपल्या संस्थे मुळेच .

२०११ मध्ये मी कृषी विज्ञान शेतकरी मंडळ नावाचा गट तयार केला व त्या गटा मार्फत शेतकऱ्या करिता अनेक उपक्रम राबवीत आहे.त्या पैकी एक कार्यक्रम म्हणजे ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम दहा वर्षापासून यशस्वी राबविल्या बद्दल (कृषी मालाचे पणन व्यवस्थापन ) या विषयाकरिता दि.०३/०७/२०१९ ला दूरदर्शनच्या वतीने देण्यात येणारा संह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. वरील सर्व सन्मान,पुरस्कार,प्रशस्ती पत्र युवा संस्थेच्या प्रेरणे मुळेच मिळाले आहेत. आणि ते सर्व सन्मान , पुरस्कार, प्रशस्ती पत्र या संस्थेला ३५ व्या वर्धापन दिना निमित्य अर्पण करितो.

वरील सर्व कार्यक्रम युवा संस्थे मार्फत करीत असतांना अनेकांचे मार्गदर्शन, सहकार्य मिळाले. त्या मध्ये मा.श्री.दत्ताजी पाटील,नितीनजी मते, आरती मॅडम, हे सर्व नागपूरचे परंतु विशेष असे सहकार्य मिळाले ते अकोला कार्यालयातील श्री.सुरेशभाऊ लुले, अंबादासजी वसु, संघपाल वाहुरवाघ,सुधाकरराव राउत, दिवाकर देशमुख, काही नावे आठवत नाहीत त्या सर्वांचे आभार मानतो.

भारतीय किसान संघ विदर्भ प्रांतचा जैविक प्रमुख मी काम पाहत आहे.त्या प्रमाणे अकोला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदचा सदस्य म्हणून सुद्धा माझ्या कडे जबाबदारी आहे.

युवा संस्थेचे इन्साफ नावाच्या प्रकल्पमध्ये बरेच काही शिकायला मिळाले व प्रेरणा मिळाली व म्हणून मी समाजामध्ये प्रगतशील, प्रयोगशील पुरस्कार प्राप्त शेतकरी म्हणून व यशस्वी व समृद्ध शेतकरी म्हणून समाज माझ्या कडे पाहत आहे.आणि मी खरोखरच समाधानी आहे. व यातच माझे समाधान आहे.

“माझ्या यशस्वी जीवनाचा मुल मंत्र

युवा संस्थेचा इन्साफ, प्रकल्प”

पुनच्छ ३५ व्या वर्धापन दिनाच्या युवा संस्थेला व त्या मध्ये सर्व काम करण्याऱ्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा.

तसेच सर्व प्रत्येक्ष व अप्रतेक्ष सहकार्य करणाऱ्या मंडळी चे आभार व्यक्त करतो.

कृषी भूषण मधुकरराव रा. सरप

संह्याद्री कृषी सन्मान प्राप्त २०१९

Madhukar Rajaram Sarap, Social Activist

YUVA would like to express heartfelt gratitude to all the people who have contributed to YUVA’s journey of 35 years.

For other instalments of the YUVA Meri Nazar Mein Series, see #1, #2, #3, #4

Leave a Reply