Skip to main content
Child Rights

हमे अपनी जिंदगी खुद बनाने दो…

By October 7, 2023No Comments

युवामध्ये बाल अधिकार वर काम करताना आम्ही कार्यकर्ते मुलांसोबत नेहमी बाल अधिकार आणि बाल सुरक्षेवर अनेक सेशन आणि कार्यशाळा घेत असतो, त्यावेळी सुरुवातीला आम्ही हमखास काही गाणी लावायचो त्यात “मेरा भी तो अधिकार है” आणि “हमे अपनी जिंदगी खुद बनाने दो” ही दोन गाणी बालकांना ही खूप आवडतात आणि अर्थात मला ही खूप आवडतात, पण ही गाणी खरंतर जेव्हा आम्ही लावायचो तेव्हा त्या गाण्यातल्या शब्दांपेक्षा त्या गाण्याच्या दृश्यांवर बालकांचे आणि आमचे जास्त लक्ष असायचे, कारण ही दोन्ही गाणी बघायला ही खूप छान वाटतात, मी बऱ्याचदा या दोन्ही गाण्यांच्या शब्दांवर थोड अधिक लक्ष देवून ती ऐकायचो, दोन्ही ही गाणी खूप अर्थपुर्ण आहेत यात अजिबात शंका नाही पण त्यातील ‘हमे अपनी जिंदगी खुद बनाने दो’ ह्या गाण्यातील शब्द हे जबरदस्त सकारात्मक मेसेज देणारी आणि मुलांना नेमकं काय वाटत, त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, मते काय आहेत ते अधिक प्रभावीपणे या गाण्यात मांडले आहे असे मला वाटते आणि त्यामुळेच हे गाण मला अधिक प्रभावी वाटत… खरंतर या गाण्याच्या माध्यमातून मुलांच्या भावना खूप चांगल्या प्रकारे व्यक्त झाल्या आहेत पण प्रश्न हा आहे कि आपले बचपन मागण्याची परिस्थिती मुलांवर मुळात आलीच का…? आणि तेच आपण समजून घ्यायला हवं असे मला वाटते. बालके ही प्रामुख्याने आपल्या समाजातील एक असा घटक आहे जो कायम मोठ्यांवर अवलंबून असतो आणि त्यामुळेच समाजातील सर्वात वंचित व दुर्लक्षित घटक हे बालक आहेत. बालकांना स्वतंत्र विचार असू शकतात, त्यांना ही भावना असतात, त्यांची ही काही मते असतात हे समाज म्हणून आपण अजून ही स्विकारत नाही आहोत. त्यामुळे आज या लेखात प्रामुख्याने पालक आणि समाज म्हणून आपली काय भुमिका असायला हवी यावर माझा जास्त भर असणार आहे. पालक आणि समाज म्हणून आपण बालकांची स्वप्ने, त्यांची मते व त्यांचे विचार समजून घेण्याच्या संदर्भात आपण कुठे कमी पडतोय, आपल्याकडून कळत नकळत काय चुका होत आहेत हे आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, त्यावर आपण चर्चा करणार आहोत, कारण बालके ही उद्याचे भविष्य आहेत अस जरी आपण म्हणत असलो तरी त्यांचे आज चे वर्तमान सुरक्षित ठेवण, विकसित करणे हे जास्त महत्वाचे आहे असे माझ प्रामाणिक मत आहे.

मुळातच बालक जन्माला आल्यापासून आपले पालक म्हणून त्याच्यावर नियंत्रण सुरु होते, अर्थात यात काळजी व संरक्षणाची भावना ही काही प्रमाणात असतेच यात वाद नाही पण मुलांवर कळत-नकळत का होईना आपण आपली मते, आपल्या आवडी-निवडी आणि आपली स्वप्ने लादत असतो, मुलाने कसं राहावं, कसं वागावं, काय खावं हे जसं जसं वय वाढत जात तसं तसं ते अगदी नियंत्रित होत जाते, जर मुलगी असेल तर त्यात जरा जास्तच नियंत्रणाची भावना येते आणि त्यातूनच पालक म्हणून आणि समाज म्हणून बंधने लादण्याची सुरुवात होते, त्यात प्रामुख्याने, हे करू नको, बाहेर खेळायला जावू नको, मुलांशी जास्त बोलू नको, घरी लवकर ये, घरातल्या कामात लक्ष दे, इत्यादी हे घडतंच. जेंडर च्या दृष्टीने विचार केला तर बऱ्याचदा एकाच घरात मुलगे आणि मुलगी असतील तर त्यात ही भेदभाव होताना दिसतो, त्या ठिकाणी अर्थात मुलींना बऱ्याच मर्यादांना सामोरे जावे लागते. कधीकधी संस्कार, शिस्त या नावाखाली कितीतरी पालक मुलांना अक्षरशः वेठीस धरतात हे वास्तव आहे. आपल्या मुलांना सगळ्याच गोष्टी यायला हव्यात, इतर मुलांपेक्षा ते मागे पडू नये हीच धडपड अनेक पालकांची आपल्याला दिसत असते विशेषतः हे चित्र उच्चभ्रू वर्गात आहेच पण आता हे लोन हळूहळू मध्यमवर्गीय आणि काही प्रमाणात निम्नवर्गीय समाजात ही दिसायला लागले आहे. आपल बालक सगळ्यात ‘बेस्ट’ असायला हवं हा अट्टाहास कशासाठी आणि का हे आता आपण स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. बालक म्हणजे आपले आयुष्यातील अधुरे राहिलेले ख्वाब पुर्ण करणारे रोबो नाहीत हे आपण मान्य करायला हवं, ते एक स्वतंत्र्य व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांची ही स्वतःची वेगळी स्वप्नं असू शकतात किंबहुना असतात हे पालक आणि समाज म्हणून आपण मान्य करायला हवं…मुलांची काळजी घेणे व त्यांचे संरक्षण करणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे यात मुलभूत फरक आहे. काळजी व संरक्षणामध्ये आपुलकी, जिव्हाळा, प्रेमाची भावना ही अधिक असते जी नियंत्रणाच्या भावनेमध्ये नसते असे माझं स्वतःच व्यक्तिगत मत आहे. मानसशास्त्रीय दृष्टीने ही नियंत्रण ही भावना वर्चस्ववादाला खतपाणी घालणारी आहे. आपण नियंत्रण अशा व्यक्तीवर करतो जिथे आपण सुप्रीम असतो आणि जे दुय्यम किंवा दुर्बल असतात त्यांच्यावर साधारणतः नियंत्रण करण्याची भावना असते. त्यामुळे बालकांच्या संदर्भात काळजी व संरक्षण ही भावना असायला हवी, नियंत्रणाची नाही हे मला प्रकर्षाने इथे मांडायचे आहे.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील कुठल्याही नाते-संबंधात (मग ते कौटुंबिक असो किंवा व्यावसायिक ) संवाद महत्वाचा असतो, पण बालकांच्या बाबतीत संवाद तर अतिशय महत्वाचा आहे आणि आजच्या काळात जिथे सोशल मिडिया इतका प्रभावी झाला आहे ज्यात लोकं वास्तव जगापेक्षा आभासी जगात जास्त गुंतलेले आहेत, त्याच्या आहारी गेले आहेत, अगदी त्यात व्यसनी झाले आहेत असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. हल्ली सोशल मिडीया वरून लोकं आपले स्टेटस, Standerd of Living ही ठरवू लागले आहेत, एकाच कुटुंबातील संवाद आता प्रत्यक्ष होण्याऐवजी आभासी होवू लागले आहेत, अशावेळी बालके जी मुळातच दुर्लक्षित असतात ती अजून दुर्लक्षित होण्याची शक्यता खूप वाढू लागली आहे. पूर्वीची संयुक्त कुटुंब पद्धत जावून आता काळानुसार विभक्त कुटुंब पद्धती आली, हम दो, हमारे दो अशाप्रकारची चौकोनी कुटुंब पद्धत आली पण सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेत आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या टिकून राहण्यासाठी या चौकोनी कुटुंबपद्धतीत ही बदल होवून हम दो, हमारा एक हा विचार रुजत चालला आहे, मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आई- बाबा दिवसभर धावताहेत, पळत आहेत, काम करत आहेत, मोल-मजुरी करत आहेत, त्याही पुढे जावून प्रेझेन्टेशन, पोजिशन, प्रिपरेशन यात दमछाक होणाऱ्या आई बाबांना मुलांकडे पाहायला वेळ नाही, त्यामुळे मुले आता गॅझेट च्या सानिध्यात राहू लागली आहेत, बालके मैदानात खेळत नाहीत, बालके बोलत नाहीत फक्त बघावं तेव्हा मोबाईलवर-किंवा कम्प्युटर वर असतात, आपल्याला मुलांसाठी थोडा वेळ काढायला हवा, मुलांसोबत बोलायला हवं, त्यांना काय वाटत, त्यांना काय हवंय, त्यांच्या भावना, त्यांच्या चिंता आपण समजून घ्यायला हवं पण आपण ते करत नाही आणि मग लहान वयात मुलांची मने कोमजून जातात, मुले नैराश्याच्या गर्तेत जातात, हल्ली लहान वयातील मुलांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रकार ही वाढू लागले आहेत. मुलांच्या उज्वल भविष्याच्या नादात आपण मुलांचे आज चे वर्तमान उध्वस्त करत आहोत हे आपल्या लक्षातच येत नाही. खरंतर आपण हे थांबवू शकतो, मुलांना दर्जेदार वेळ देवून, मुलांसोबत अर्थपुर्ण संवाद साधून……

मुलांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा आणि त्यांना दुर्लक्षित करण्यापेक्षा त्यांच्या जवळ बसून, त्यांना वेळ द्या, त्यांच्यासोबत गप्पा मारा, त्यांच्याशी संवाद साधा, आपले मुलांसोबत चे संवाद इतके सुंदर आणि छान असायला हवे कि मुलांना ही आपल्याशी बोलायला छान वाटलं पाहिजे, त्यांनी ही आपल्या भावना, काळजी, चिंता आपल्या सोबत शेअर केली पाहिजे. संवादामध्ये भावना दडलेल्या असतात, चांगल्या भावना चांगले वातावरण निर्माण करतात. म्हणून संवाद महत्वाचा आहे, यातून आपल्याला मुलांच्या आवडी-निवडी, त्यांची मते, त्यांच्या भावना समजून घेता येतात पण आपला भर हा आभासी संवादावर जास्त आहे, आपल्या सोशल मिडीयावरील पोस्ट ला किती लाईक्स मिळाल्या ह्यापेक्षा आपले मुल आपल्याला लाईक करत कि नाही हे जास्त महत्वाचे आहे.

हे झालं कुटुंबात राहणाऱ्या बालकांच्याबाबतीत पण समाजात अशी ही काही बालके आहेत कि सर्व प्रकारच्या अधिकारांपासून कोसो दूर आहेत. बेघर बालके, अनाथ झालेली बालके, काम करणारी बालके, गरिबीत आणि अतिशय हालाखीच्या परिस्थितीत राहणारी बालके, भिक्षा मागणारी बालके, अनेक प्रकारच्या शोषणाचे बळी असलेली बालके इत्यादी इत्यादी..या बालकांच्या सुरक्षेचे व विकासाचे मुद्दे खूप गंभीर आहेत, या बालकांना काळजी व संरक्षणाची खूप गरज आहे कारण ही बालके अशा कुटुंबातून येतात जे सक्षम नाहीत, जेव्हा कुटुंब सक्षम नसतात तेव्हा या बालकांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची आहे असे कायद्यात नमूद आहे आणि यासाठी बालकांच्या सर्वागीण विकासाची भुमिका पार पाडणाऱ्या यंत्रणांची मदत घेता येते, अशावेळी बालकांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी कायद्यात असलेल्या वेगवेगळ्या यंत्रणांनी काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्याप्रती अतिशय संवेदनशील व अधिक सक्षम होण्याची आवश्यकता आहे. पण ज्यावेळी कुटुंब आणि यंत्रणा जेव्हा सुरक्षेसाठी सक्षम नसतील तेव्हा समाज म्हणून ही सर्वस्वी जबाबदारी आपल्या सर्व मोठ्या लोकांची आहे आणि समाजाने ही जबाबदरी अतिशय संवेदनशीलपणे निभावणं आवश्यक आहे. खरंतर बालके ही सुरक्षित कुटुंबासोबत राहिली, वाढली तर त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होते, त्यामुळे अशा कुटुंबाना सक्षम करणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे.

आपल्या देशाने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाचा स्विकार केला आणि २६ जानेवारी १९५० पासून आपल्या देशात संविधान लागू झाले, आपल्या भारतीय संविधानाने सर्व भारतीय नागरिकांना मुलभूत अधिकार बहाल केले आहेत, जे बालकांना ही लागू आहेत ज्यात प्रामुख्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सर्व प्रकारच्या भेदभावापासून संरक्षण, मोफत शिक्षणाचा अधिकार इत्यादी याशिवाय २० नोव्हेंबर १९८९ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने बोलावलेल्या जागतिक बाल हक्क परिषदेत एक बाल हक्क संहिता संमत केली, ज्यावर १९३ राष्ट्रांनी सही केली आहे, या संहितेत बाल अधिकारांविषयी मांडणी केली आहे. भारत सरकारने ही ११ डिसेंबर १९९२ रोजी या मसुद्यावर सही केली आहे, आणि तेव्हापासून आपण सगळे बालप्रेमी झालो आहोत आणि सर्व मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध झालो आहोत. मुलांसाठी सुरक्षित बालकेंद्री वातावरण आणि संवेदनशील असणाऱ्या समाज निर्मितीची सुरुवात करूया जेणेकरून आपल्या समाजातील प्रत्येक मुल त्याच्या मनासारखं आयुष्य जगतील, त्यांची स्वप्नं बिनदिक्कत पुर्ण करतील, त्यांचा अर्थपूर्ण सहभाग नोंदवतील, आपल्या सगळ्यांना कुटुंब, शासकीय व्यवस्था व यंत्रणा आणि समाज म्हणून मुलांसोबत प्रत्येक स्तरावर कदम से कदम बढाकर चलना है…

‘कभी कही किसी से ना डरेंगे हम, मानवता कि नीती को रचेंगे हम….!

सपने ये हमारे हमे साथ दिजीये, मिले है आज हम तो चलो जिंदगी जिये…!!’

Leave a Reply