आपल्या देशात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. अनेक वेळा जे युवा खेळाडू चॅम्पियन होतात, त्यांचाच अनुभव आणि सहभाग जास्त दिसतो. मात्र, असंघटित कामगार वर्ग रोजच्या जीवनात त्यांच्या कामात इतका व्यस्त असतो की, त्यांना खेळामध्ये सहभागी होण्याची संधी बहुधा मिळत नाही. घर आणि काम यामध्ये त्यांचा संपूर्ण दिवस जातो, आणि त्यांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही.
या कारणामुळे युवा संस्थेने असा उपक्रम राबवला ज्याचा उद्देश होता कामगारांना एकत्र आणणे आणि त्यांच्यातील संवाद व सामूहिकता वाढवणे. युवा संस्था असंघटित कामगारांसोबत काम करते, ज्यात बांधकाम कामगार, फेरीवाले, घरगुती कामगार आणि घरातून काम करणारे कामगार यांचा समावेश होतो. संस्था कामगारांना योग्य वेतन, सुरक्षित आणि सन्मानजनक कामाच्या अटी तसेच सामाजिक संरक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षण आणि विविध कार्यक्रम आयोजित करते. याशिवाय, कामगारांना एकत्र आणण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवून, समुदायाशी जोडून विविध उपक्रम केले जातात, ज्यामुळे संवाद वाढतो आणि कामगार एकत्र येतात.

खेळाच्या माध्यमातून असंगठित कामगारांची एकत्रित ताकद
कार्यक्रमाचे खास क्षण
युवा संस्था आणि Labour Helpline यांनी आयोजित केलेली CPL- कम्युनिटी प्रीमियर लीग 2026 ही एक वेगळी आणि समाजाभिमुख पहल होती. “खेलेंगे – बदलेंगे – सीखेंगे, ह्या वर्षी बदलत्या हवामानासोबत खेलेगी बस्ती! सीखेंगे लोग! बदलेगा मौसम” या संकल्पनेवर हा उपक्रम 1 आणि 2 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुल, CBD बेलापूर, नवी मुंबई येथे पार पडला.
गेल्या तीन वर्षांपासून (2023, 2024, 2025) युवा संस्थेने “खेलेंगे – बदलेंगे – सीखेंगे” ही संकल्पना राबवली आहे. या उपक्रमामुळे अनेक वस्त्यांमधील विविध लोकांना एकत्र आणून खेळाच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवण्याचा प्रयत्न केला जातो. 2026 मध्ये बदलत्या हवामानाचा मुद्दा या उपक्रमात जोडला गेला. नवी मुंबई Labour Helpline टीम, तसेच पनवेल, मुंबई आणि नवी मुंबई येथील असंघटित कामगारांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.
या उपक्रमात पुरुषांसोबत महिलांनाही समान महत्त्व दिले गेले. महिलांचा सक्रिय सहभाग हा उपक्रमाचा प्रेरणादायी भाग ठरला. समुदायासाठी क्रिकेट स्पर्धा आणि महिलांसाठी लगोरी तसेच क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या गेल्या, ज्यामुळे खेळाचा अनुभव मनोरंजक आणि शिकवणारा ठरला.
या उपक्रमात युवा संस्थेसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रपती पारितोषिक विजेते क्रिकेट प्रशिक्षक मा. विकास साटम, माननीय नगरसेविका सुरेखा नरभागे, तसेच युवाच्या कार्यकारी संचालक रोशनी नुगेहल्ली यांचा समावेश होता. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर भाष्य करण्यासाठी क्रिकेट समालोचकही उपस्थित होते. मान्यवरांचे राजू यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांचे स्वागत केले. याशिवाय विविध वस्त्यांतील असंघटित कामगार आणि घरगुती कामगारांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
युवाच्या सादरीकरणात राजू आणि सुजित यांनी CPL उपक्रमाची माहिती दिली, तसेच दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे नियम स्पष्ट केले. उपक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करून करण्यात आली. नंतर सर्व खेळांचे नियम समजून घेतल्यावर शुभेच्छा देऊन खेळ सुरू झाले.
या उपक्रमात पनवेल, मुंबई आणि नवी मुंबई येथील पुरुषांसाठी 15 क्रिकेट संघ आणि महिलांसाठी 6 संघ, तसेच महिलांसाठी 3 लगोरी संघ सहभागी झाले. खेळाडूंच्या चेहऱ्यावर उत्साह स्पष्ट दिसत होता. पहिल्या दिवशी सर्व खेळाडूंनी प्रचंड जोशाने खेळले. क्रिकेट समालोककांनी रंगतदार भाष्य केल्यामुळे सामने अधिक आकर्षक आणि उत्साही झाले. जिंकणारे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले, तर हरलेल्या संघांनी सकारात्मकता दाखवत इतर संघांना प्रोत्साहन दिले. पुरुष आणि महिलांमध्ये संघभावना आणि खेळाडू वृत्ती स्पष्ट दिसली.

महिला क्रिकेट संघ

महिला लगोरी संघ
सर्व खेळाडूंनी मेहनतीने खेळत अनेक फोर, सिक्स आणि विकेट मिळवल्या, ज्यामुळे प्रेक्षकांना वेगळाच उत्साह अनुभवायला मिळाला. त्याच दिवशी महिलांची लगोरी स्पर्धा देखील पार पडली. महिलांनी अत्यंत सुंदर आणि जोशपूर्ण पद्धतीने हा खेळ सादर केला. लगोरीच्या अंतिम सामन्यात वाशी नाका सानपाडा संघ विजेता ठरला.
दुसऱ्या दिवशी अंतिम आणि महत्त्वाचे सामने खेळवण्यात आले. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी खेळाडूंचा उत्साह आणखी वाढलेला दिसला. प्रत्येक संघ जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होता. अंतिम सामन्यात सेक्टर १८, पनवेल गर्ल्स संघ विजयी ठरला, तर पुरुषांमध्ये अर्ष इलेव्हन, पनवेल संघाला विजय मिळाला. सर्व विजेत्या संघांना युवा संस्थेकडून पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले.
या दोन दिवसांच्या उपक्रमाने केवळ खेळ नाही तर संघभावना, सकारात्मक ऊर्जा, आणि समुदायाच्या एकात्मतेचा अनुभव सर्वांनाच मिळाला.
विजयी संघाचे काही खास क्षणचित्रे:

सानपाडा इल्हेवन, सानपाडा

सेक्टर १८, पनवेल गर्ल्स

अर्ष इलेव्हन पनवेल

युवा साथी CPLसंघ

