Skip to main content
Child Rights

मला जगू द्या … मला शिकू द्या … मला वाढू द्या…

By August 11, 2018May 5th, 2023No Comments

“तू शिकून काय करणार आहेस ? जा काम कर घरातली..” का हे अशाप्रकारचे उद्गार मुलींसाठी वापरले जातात ? का त्यांना नेहमी प्रत्येक क्षेत्रात दुय्यम स्थान दिले जाते ? जेव्हा आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्या वेळी सर्व नागरिकांना, मानव जातीला काही मुलभूत अधिकार दिले गेले आणि हे अधिकार सर्व मानवांना दिले परंतु जेव्हा मुलींची गोष्ट येते तेव्हा मात्र बऱ्याचदा मुलगी म्हणून तिला काही अधिकार नाकारले जाते किंवा अप्रत्यक्ष बंधने लादली जातात. “तू हे का करतेस तू ते नको करू….”का ह्या मर्यादा फक्त मुलीनांच असतात ? मुलींना म्हणतात तू मर्यादेतच रहा, का हे मुलीनांच हे सहन करावं लागते?

मित्रांनो असे खूप काही प्रश्न आहेत माझ्या मनात, जर ते विचारले गेले तर कोणाकडेच त्याचे उत्तर मिळत नाही. जेव्हा त्या प्रश्नांच उत्तर देता येत नाही तेव्हा त्या व्यक्तींकडून एकच वाक्य ऐकायला मिळते की “तू पोरगी आहेस ! तुला काय करायचंय शिकून ? का आम्हाला नेहमी दाखवले जाते की तू कमजोर आहेस तू काहीच नाही करू शकत… मी विचारते का ? आणि जेव्हा आम्ही मुली हे ऐकून त्यावर आपले मत व्यक्त करायला जातो तेव्हा आमचे पालक आम्हाला सांगतात “आम्हाला तुझी काळजी वाटते, तुझी चिंता करतो म्हणून आम्ही तुला थांबवतो.. का ? आई वडिलांसाठी तर आपली मुले नेहमी सामान असतात ना मग मुलांना का नाही त्या मर्यादा असतात ? त्यांना का नाही थांबले जाते ? हे वाक्य फक्त मुलींसाठी का वापरले जातात.? का मुलींवर हि बंधने ..?

‘स्त्रीशिक्षण” हा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे परंतु आज आपल्या भारतातल्या एकूण मुलींच्या संख्येपैकी ९०% तरी मुली सुशिक्षित आहेत का? नाही का ? कारण त्यांना मर्यादा दिली जाते त्यांना सांगितले जाते कि तुझं जीवन “चूल आणि मूल एवढ्या पर्यंतच सीमित आहे”. पण हे कुणी का लक्षात घेत नाही कि मुलींची पण काही स्वप्ने असतात, तिला पण अस वाटतं कि मी मोठी होऊन माझ्या आई –वडिलांसाठी, स्वतःसाठी मी काही तरी अस करून दाखवेन कि जेणेकरून माझ्या भविष्यात मला कोणाकडेही हात पसरवू लागणार नाही. हात पसरवण्याची गोष्ट तर वेगळीच परंतु मला पुढे होऊन काही तरी बनायचे आहे अशी तिची अपेक्षा असते. परंतु काही मोजकेच असे पालक असतात कि जे आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी सर्वांसोबत लढतात. समाजासोबत लढतात…मला सांगा समाज म्हणजे काय मित्रानो? समाज एक असा घटक आहे ज्याला आपण खूप महत्वपूर्ण जागा देतो, आपल्या रोजच्या जीवनात समाजाला इतकं महत्वपूर्ण स्थान आपण का देतो ? मुलीला शाळेत शिकवण्याचाच फक्त प्रश्न असतो आणि हे फक्त त्या मुलीने आणि तिच्या आईवडिलांनीच ठरवले पाहिजे. परंतु असे होते का ? नाही. आपले आई-वडीलही बहुदा समाजाचं ऐकून हेच वाक्य नेहमी बोलतात ‘‘काय करायचंय तुला शिकून? काय करशील तू शाळेत जाऊन ?’’ माझी एक सर्व पालकांकडे मागणी आहे, “आपला निर्णय आणि तिचा निर्णय’’ हा विचार करून आपल्या मुलीला एक चांगला मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करा आणि बघा ती पुढे होऊन एवढ काही करून दाखवेल ना आई वडिलांना गर्व वाटेल कि आपल्या मुलीला आपण मार्गदर्शन केल्यामुळे तसेच सर्वात महत्वपूर्ण म्हणजे तिच्यात असलेल्या शिक्षणाच्या जिद्दीमुळे, ती आज स्वावलंबी बनली.

आमच्या सर्व मुलींची आई माझी ‘“सावित्रीमाई फुले’’ यांनी स्त्री शिक्षणासाठी खूप महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे .’’स्त्रीशिक्षणासाठी’’कोणाचाही नाही तरी आपल्या आईचा विचार करा, शेणाचे गोळे, दगडाचे मार सहन करून आमच्यासाठी म्हणजेच स्त्रीशिक्षणासाठी समाजाशी झुंज दिली. कमीत कमी त्यांचा तरी मान ठेवा ! जी लोक आजही स्त्रीशिक्षणाच्या विरोधात आहेत असे काही लोक आहेत ज्यांना माझ्या मते ‘‘समाजकंटक’ हेच नाव पाडले पाहिजे. आजही मी जिथे राहते तिथे म्हणजे मानखुर्द मध्ये अशा अनेक सोसायटी आहेत जिथे आजच्या वेळी फक्त आणि फक्त ४०- ४५ % मुली शिकत आहेत. ही विचार करण्याची गोष्ट आहे. आपण म्हणतो कि आपला भारत देश श्रेष्ठ आहे परंतू माझ्या मते आपला भारत तेव्हाच श्रेष्ठ होऊ शकतो जेव्हा आपण “स्त्रीशिक्षणाला’’ आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान देऊ.

आजही प्रत्येक दुसऱ्या घरात बघायला भेटते कि घरात कुणाला रोजगार नाही त्यामुळे माझी मुलगी ड्रॉप आऊट आहे आणि ती आता कामाला जाते. आज ही माझ्या वस्तीत मला हे बघायला मिळते कि घरातील मोठा मुलगा शाळेत जात नाही, दिवसभर खाली मैदानात खेळतो, मित्रांसोबत इथे तिथे फिरतो आणि घरात राशन नाही, लहान भावंडांचा शाळेचा खर्च, शाळेतची फी भरण्यासाठी पैसे नाही म्हणून १८-१९ वर्षाची मुलगी जिने फक्त याच कारणांसाठी आपले शिक्षण सोडले आणि ती ड्रॉप आऊट झाली. का सगळे त्याग मुलीनींच करावे ? त्यागाची गोष्ट आली तर मुलीच का डोळ्यासमोर येतात ? जेव्हा आपण म्हणू ना माझाच भारत श्रेष्ठ आहे तेव्हा आपण आधी हे बघितले पाहिजे कि मुलींच्या शिक्षणासाठी काय करतोय ?

बघायला गेलो तर प्रत्येक क्षेत्रात मुलीच पुढे आहेत, १०वी १२वी चा जेव्हा निकाल लागतो तेव्हाही आणि कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला तर चांगले मार्क्स नी पास होणाऱ्यामध्ये मुलींचे सर्वात जास्त प्रमाण आहे पण तरीही त्यांना तेवढे महत्व दिले जात नाही. का करतो आपण अस ? या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे ? परंतु तरीही या देशातले काही नागरिक जास्तीत जास्त प्रमाणात मुलींना नेहमी कमी लेखत असतात. जेव्हा मुली खूप काही करू शकतात तरीही आपण त्यांना नेहमी रोखतो. “कधी थाबणार आपण, कधी समजणार आपण ? माझ्याकडे असे खूप अनुभव आहेत सांगण्यासारखे पण माझ्या सांगण्याला आणि तुमच्या या गोष्टींबद्दल विचार करण्याला तेव्हाच खरा अर्थ प्राप्त होईल जेव्हा आपण काहीतरी करू आपण सर्वांनी ‘’स्त्रीशिक्षणासाठी’’ झुंज दिली पाहिजे, जेव्हा आपण स्वतः “स्त्रीशिक्षणाच’’ महत्व समजू तेव्हाच आपण दुसऱ्याना समजवू शकतो असे मला वाटते . म्हणून आज एक निर्णय घ्या “स्त्रीशिक्षणाला” पाठिंबा मी देणार त्यासाठी जर मला माझ्या कुटुंबियांच्या विरोधात जाव लागेल तरी चालेल’’ पण मी माझ्या भारत देशातील आजची पिढी जी भविष्यात सुजाण नागरिक येणार आहे त्या पिढीच्या शिक्षणासाठी मी नक्की नेहमी लढत राहीन.

सरस्वती पागाडे, बाल अधिकार संघर्ष संघटन, बाल प्रतिनिधी, एम पुर्व विभाग, मानखुर्द.

Leave a Reply