Skip to main content
HabitatInformal WorkLivelihoods

घराच्या शोधात असणारा कामगार

By May 28, 2018February 20th, 2024No Comments

गावातून शहराकडे वळलेले श्रमिक

श्रम आणि श्रमाची व्याख्या तशी खूप व्यापक आहे, ती एका शब्दात किंवा वाक्यात बांधण्यासारखी देखील नाही. इतिहासापासून प्रत्येक व्यक्तीच्या श्रमाला आदर आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठीचा जागतिक संघर्ष अजूनही संघटीत आणि असंघटीत मार्गाने सुरु आहे. जागतिक पातळीवर शहरांची संख्या आणि त्यात राहणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे सहाजिकच शहरात जीवन जगण्यासाठी, उत्पन्नाची साधने शोधण्यासाठी, नोकरीच्या,व्यवसायाच्या शोधात येणारी अनेक माणस, कुटुंब आपल्याला दिसतात. मिलोन मिल अंतर कापून आपली गावं, गावगाडा, नातीगोती, शेती, संस्कृती, पूर्वापार चालणारा व्यवसाय, कौशल्य मागे टाकून लोकं शहरात येताना दिसतात. तस 
 ‘ शहरात लोक जगणे शोधण्यासाठी’ येतात अस म्हंटल तरी देखील चालेल. कारण आजही गावात, छोट्या शहरात होत असलेले जात, धर्मांच्या नावावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला कंटाळून देखील बरेच लोक आपलं गाव सोडून इतर गावात किंवा शहरात येतात. सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने प्रगल्भ असणारे लोक ह्या शहरात आपली थोडी राहण्यापूर्ती तरी जागा शोधतात. पण सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मागासलेल्या प्रवासी लोकांसाठी शहरात आल्यानंतर राहायचं कुठे असा मोठा सवाल असतो. आधीच शहरं अशी तुडुंब भरत चालेली माणसांनी, गाड्यांनी, आणि सिमेंटच्या जंगलांनी तशी माणसांची घरं आणि मन देखील तोकडी होत चालेली दिसतात. त्यामुळे शहरातील अत्यंत निकृष्ट, न राहण्या योग्य ठिकाणी राहण्याशिवाय तसा दुसरा पर्याय त्यांच्याकडे नसतोच. अशीच कुटुंब आणि लोक आपल्याला मोठ्या ब्रिजच्याखाली, फुटपाथवर, रस्त्यावर उघड्यावर, मोठ्यापाईपच्या आत, बाजाराच्या बाजूला राहताना दिसतात. कोणत्याही छताशिवाय राहणाऱ्या ह्या नागरिकांना बेघर म्हणतात. बर ही लोक असतात तरी कोण ? कुठून आलीत ? काय करतात? असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतात.

शहरातील बेघर श्रमिक

शहरातील घर असलेल्या लोकांना हे बेघर नागरिक तसे भिकारी, दारुडे, चोर किंवा उपद्व्यापी वाटतात. मुलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे अस्वच्छ वाटतात. पण अस्तित्वात हेच बेघर शहरातील असंघटीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करत असताना दिसतात. त्यांच्या स्वस्त उपलब्ध असणाऱ्या श्रमाने या शहरातील अनेक कामे होत असतात. बहुतेक महिला या घरकाम, जेवण बनवणे, फेरीवाले, कचरा वेचण्याचे किंवा साफसफाई करणे असे काम करताना दिसतात. पुरुष बहुदा कुली म्हणून, नाका कामगार, बांधकाम कामगार, एखाद्या हॉटेल किंवा दुकानात, गॅरेजमध्ये सहायक म्हणून, सफाई कामगार म्हणून काम करत असताना दिसतात. ज्यात त्यांना केवळ दिवसाला रु.१०० ते रु.१५० कमवता येतात. हि सर्व कामे तशी असंघटीत, अनियमित आणि हंगामीच आहेत. त्यांना मिळणारे रोजचे वेतन हे देखील तसेच स्थिर नसल्यामुळे ते जास्त बचत देखील करू शकत नाहीत. त्यामुळे स्वतः च्या मुलभूत गरजा भागवणे त्यांना अवघड जाते. पावसाळा तर त्यांच्यासाठी आणखीन कठीण परिस्थिती घेवून येतो त्या दिवसात काम मिळवणे देखील कठीण होऊन जाते. रस्त्यावर उघड्या संसाराला पहाव कि कामाला जाव अशी दयनीय अवस्था असते. जेव्हा काम नसते, तेव्हा पैसा नसतो आणि जेव्हा पैसा नसतो तेव्हा एकवेळचे पूर्ण जेवण हि मिळणे त्यांना कठीण होऊन बसते.

कुटुंबातील दोन जणांनी कमावले तर रु. २५०/- ते रु. ३०० रोज घरात जमा होतात, पण आजच्या महागाईत रु.२५०/- रोज अपूर्ण आहे असे बऱ्याच बेघर महिला सांगतात. बेघर असल्यामुळे स्वतःच्या ओळखीचा किंवा योग्य रहिवासी पुराव्याच्या अभावामुळे बऱ्याचदा त्यांना कोणी नोकरीवर ठेवत नाही.

संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महिन्याचा पगार असतो, आठवड्याची सुट्टी असते, रोज जेवणाची निदान एक तास तरी सुट्टी असते, सुरक्षा म्हणून त्यांचे जीवन विमा, अपघात विमा असतो, पीएफ, ग्रेचुटी आणि अशा अनेक सुविधा. पण असंघटीत काम करणारा हा बेघर मजदूर मात्र रोज स्वतः चे पोट भरण्यासाठी कुठलीही सुट्टी न घेता मिळेल ते काम करत, दुपारच्या जेवणाची पर्वा न करता- मिळेल ते खाऊन, स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता आपले काम करत असतात. इतर कामगारांना स्वतः चे घर असल्यामुळे निदान ८ तास शांत झोप घेण्यासाठी सुरक्षित अशी जागा असते पण बेघरांना मात्र रात्रीची झोप देखील बहुदा मिळत नाही. येणारे जाणारे समाज विघटक लोक, पोलीस रात्रीच्या वेळी कधीही मारून उठवणे, अंगावर पाणी टाकून उठवणे, काठीने मारून उठवणे अशा अनेक घटना हे बेघर नागरिक आपल्याला सांगतात. कुर्ल्याची मंदा रोज सकाळी घरकाम करते आणि रात्री आपल्या मुलींच्या सुरक्षे साठी जागी असते.दीदी मला रात्रीची गाढ शांत झोप हवी आहे बाकी काही नको अस ती सतत म्हणत असते.

गोष्ट असंघटीत बेघर श्रामिकांची

संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना ६० वर्ष झाली की रिटायरमेंट मिळते पण माटुंगा किंग सर्कल येथे राहणाऱ्या अहिल्याबाई ह्या आजींना ६० वर्ष पूर्ण होऊन हि अजून ही काबाड कष्ट करून आपली स्वतःची पोटाची भूक भागवावी लागते. त्या सांगतात की, गेली अनेक वर्षे त्या त्यांच्या पतीसोबत रस्त्यावर जीवन व्यतीत करत होत्या, “आमची दोन्ही मुले आमची जबाबदारी घ्यावी लागेल म्हणून आम्हाला सोडून गेली” त्यांचे हे वाक्य सगळच सांगणारे आहे. दोन वर्षापूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले, तेच मिळेल ते काम करून त्यांचा संसारगाडा चालवत होते.पती वारल्यानंतर त्यांनी कचरा वेचण्याचे काम सुरु केले. सदर काम त्यांच्या वयानुसार थोडे कठीण होते परंतु इतर कोणताही दुसरा मार्ग त्यांच्याकडे नाही असे त्या म्हणतात.

रवी नाडार मुळचा तामिळनाडूचा आहे, मुंबईत आला तेव्हा केवळ १६ वर्षांचा होता, आता त्याचे वय २२ वर्षे आहे. मुंबईत आला तेव्हा बहिणीकडे राहत होता आता बहिणीचा संसार वाढत चालाय त्यात आपली लुडबुड नको म्हणून तो आता माटुंगा ब्रिजच्या खाली राहतो, तो मुंबईत आला तेव्हा चहाच्या टपरीवर, हॉटेल मध्ये साफसफाई करण्याची कामे करायचा, नंतर चार वर्षापूर्वी बी एम सी च्या एका सफाई विभागाच्या मुकादम contractor शी भेट झाली आणि त्याने“ कलसे काम पे आओ” म्हणत त्याला काम दिले हि. तो आता बीएमसी मध्ये सफाई कामगार म्हणून कंत्राटपद्धतीत काम करतो. सायन- माटुंगा- दादर असा पूर्ण पट्टा तो दर दिवशी झाडून साफ करतो. साफसफाई कामगारांच्या मुलभूत गरजा आणि वेतनासाठी, योजना मिळविण्यासाठीचा त्यांचा संघर्ष, कामगार युनियन सोबत चालत असेलेल्या त्यांच्या बैठका आणि सरकार सोबतच्या वाटाघाटी बाबत बरच काही तो भेटल्यावर बोलत असतो. तस पाहायला गेलं तर बेघर नागरिकांसाठी काम मिळवण आणि कमवण,स्वतःचे पोट सांभाळण हा एक रोजचा खड्तर प्रवास बनला आहे.

बेघर नागरिकांच्या हक्कासाठी संस्थेची साथ

बेघर नागरिकांच्या मुलभूत हक्क्दारीसाठी आणि सुविधामिळवून देण्यासाठी काम करत असताना त्यांना त्यांच्या अधिकाराबाबत जागरूक करण हा एक महत्वाचा उद्देश घेऊन युवा संस्थेने ६ वर्षापूर्वी काम सुरु केले.

मुलभूत संसाधन केंद्राच्या माध्यमातून संस्थेने अहिल्याबाईना अंत्योदयचे राशन कार्ड मिळवून देऊन निदान त्यांचा अन्नाचा खर्च कमी करण्यासाठीचा एक प्रयत्न केला, त्यांचा रोजचा संघर्ष अजूनही त्यांनी सुरु ठेवलाय. आता त्या स्वतः आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतायत आणि इतर बेघर महिलांना साथ देऊन राहत आहेत.वृद्धाश्रमात रहाल का असे विचारल्यावर त्या मी स्वतः काम करीन एवढच म्हणतात.

बेघरांसोबत संघटन बांधणी आणि नेतृत्व विकासासाठीची प्रक्रिया सुरु झाल्या नंतर रवी, इसकअम्मल, ममता, सीमा, शहनाज, राजा असे अनेक बेघर नागरिक आपल्या हक्कांसाठी लढण्यासाठी एकत्र आलेले दिसले. आपले छत नसलेले घर बी. एम. सी मार्फत तुटताना पाहून आम्ही त्यांच्या डोळ्यात कधी मावळणारी आशा पहिली तर कधी व्यवस्थेच्या आणि सरकारच्या विरोधातील राग. मात्र हे अवलिये परिस्थितीला हार मानणारे नाहीत.प्रत्येकाची जशी अन्न, वस्त्र आणि निवारा हि मुलभूत गरज आहेतशी त्यांचीही आहेत्यासाठी त्यांच्या कौशल्यानुसार, शक्तीनुसार जमेल ते आणि मिळेल ते करण्यासाठी हे कामगार तयार असतात.

बेघर मजदूर एकता संघटना नाव कसे ठरले? त्याचाउद्देश्य काय?

संस्थेच्यालोकांच्या संघटन बांधणीच्या रणनीती नुसार संघटन बांधणीची प्रक्रिया सुरु झाली, बैठका आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून त्याला सुरवात झाली. दरम्यान आपण आपल्या गटाला काय संबोधायच,अशी चर्चा जेव्हा सुरु झाली तेव्हा अनेक नावं त्यांनी सुचवली त्या अनेक नावात बेघर, मजदूर, संघर्ष, एकता, संघटन असे अनेक शब्द होते. आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या संघटनेचे नाव बेघर मजदूर एकता संघटना असे त्यांनी ठरविले. हि मुंबईतील बेघर मजदुरांची पहिलीच संघटना असेल. हि संघटना आणि ह्यातील स्थानिक बेघर नेते आपल्या वस्तीतील लोकांच्या मुलभूत अधिकाराबाबतीत, योजनांबाबतीत लोकांना जागरूक करतात, बी एम सी किंवा पोलीस यांच्या मार्फत होण्याऱ्या अन्यायाबाबतीत तक्रार करतात, स्थानिक नगर सेवक, स्थानिकबी एम सी वार्ड मध्ये जाऊन त्यांच्या निष्कासना विषयी तडजोडी करतात.

बेघर मजदूर एकता संघटनेचा संघर्ष हा अजूनही सुरु आहे निवाऱ्यासाठी, मुलभूत सुविधांसाठी, सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी. ह्या कामगार महिन्यात बेघर मजदूर आणि त्यांचा संघर्ष आपल्याला कळवा म्हणून हा लेख लिहित आहोत.

बेघर मजदूर एकता संघटना जिंदाबाद !

Pooja Yadav, Programme Coordinator

Leave a Reply