खेलेंगे – सिखेंगे -बदलेंगे या संकल्पनेवर आधारित CPL -2024 चे आयोजन युवा संस्थेच्या लेबर हेल्पलाईन यांच्यातर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून असंघटित कामगार, पथविक्रेता, आणि विविध अनौपचारिक वस्त्यांमधील तरुण, महिला, कामगार व बालक यांच्यासोबत भव्य टेनिस बॉल क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. क्रिकेट हा जसा आंतरराष्ट्रीय खेळ आहे तसाच तो भारतातील अनेक गल्ली-बोळामध्ये जमेल त्या पद्धतीने आणि जमेल त्या चेंडूने मुले-मुली खेळत असतात. शहरे ज्या प्रमाणे उच्चभ्रू सोसायटी आणि गरीब कामगारांच्या वस्त्या यामध्ये विभागली आहेत तसेच त्यांची जगण्याची भौतिक आणि मनोरंजनाची संसाधने देखील विभागली गेली आहेत. काहींना ट्रेनिंग, कोच यांच्या माध्यामातून जन्मजात क्रिकेटच्या मैदानात खेळायला मिळते तर काही मात्र चांगले खेळाडू असूनही त्यांना रस्त्यावर/ फुटपाथवर खेळावे लागते. हि विषमता काही प्रमाणात दूर करता यावी म्हणून युवा संस्थेच्या लेबर हेल्पलाईन यांनी पुढाकार घेऊन ज्या वस्त्या, कामगार नाके, पथविक्रेत्यांचे मार्केट, बचत गटातील इच्छुक महिला आणि नवीमुंबई आणि पनवेल येथील वंचित वस्त्या यांना घेऊन स्व. राजीव गांधी मैदान, बेलापूर येथे २ व ३ जून २०२४ रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये एकूण २० संघांनी सहभाग घेतला त्यापैकी ५ संघ हे महिलांचे होते, २ कामगार नाक्यावरून संघ होते (नेरूळ कामगार नाका आणि वाशी कामगार नाका), ०१ पथविक्रेता मार्केट (वाशी मार्केट) मधून संघ होता तर १२ नवीमुंबई आणि पनवेल येथील वेगवेगळ्या वस्त्यांमधून क्रिकेटच्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
स्पर्धेची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविक वाचनापासून करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेची पार्श्वभूमी सांगून स्पर्धेच्या नियम- नियमावली यांचे सांघिक वाचन करण्यात आले. त्यानंतर युवा संस्थेचे अनिलदादा इंगळे व राजूदादा वंजारे यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे स्वागत केले आणि त्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. प्रत्येक तीन ओव्हर च्या या सामन्यात पहिल्या फेरीत हरलेल्या टीम ह्या बाद (नॉक-आउट) पद्धतीने खेळविल्या गेल्या. स्पर्धेसाठी आलेल्या सर्वांनी सदभावनापूर्वक आणि मुक्तपणे खेळाचा आनंद घेतला. एकमेकांची विचारपूस करत एकमेकांच्या ओळखी करून घेतल्या आणि संघांमध्ये बंधुभाव वाढविला.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रंसगी युवा संस्थेच्या कार्यकारी संचालिका मा. रोशनी नुग्गेहल्ली, नवी मुंबईतील प्रख्यात क्रिकेटपटू मा. जलाल शेख सर, मा. हिरामण पगार- अध्यक्ष घर हक्क संघर्ष समिती आणि ॲड. मिसेस जलाल शेख हे उपस्थित होते. रोशनी यांनी सहभागी महिला संघांचे व महिलांचे विशेष कौतुक केले आणि सर्वांनी एकजुटीने राहावे, खेळामधून आपले आयुष्य बदलविण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली, तर जलाल सरांनी टेनिस बॉल क्रिकेटच्या मध्ये अनेक सकारात्मक बदल होत आहेत आणि नवीन अनेक खेळाडूंना संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे वस्त्यांमधील लोकांसाठी असे अनेक उपक्रम राबविले पाहिजेत ज्यातून ते व्यसनाधीनतेकडे वळणार नाहीत असे प्रतिपादन करून CPL-2024 च्या आयोजकांचे कौतुक केले. तसेच त्यांनी पुढीलवर्षी होणाऱ्या CPL मध्ये सहभागी सर्व कामगार, महिला, वस्तीमधील तरुण यांना त्यांच्या संस्थेची जर्शी (टी-शर्ट) देण्याचे आश्वासन दिले. यावेळी ॲड. मिसेस जलाल शेख, मैदानाचे संचालक, युवा संस्थेचे नवीमुंबई, पनवेल आणि वाशीनाका टीमचे सदस्य उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते महिलांच्या प्रमुख तिन संघ त्यामध्ये प्रथम जिजाऊ महिला क्रिकेट संघ, कोपरखैरणे, द्वितीय नवसंजीवनी महिला क्रिकेट संघ, तर तृतीय घणसोली महिला क्रिकेट संघ यांना पारितोषिक आणि सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तर पुरुष संघांपैकी प्रथम क्रमांक सालाबाद प्रमाणे बालतुबाई मित्र मंडळ, बालतुबाई, बेलापूर यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक शिवसाई क्रिकेट संघ, नावडे, पनवेल आणि तृतीय क्रमांक हा ओमसाई क्रिकेट संघ, नावडे फाटा यांनी पटकावला तसेच नेरूळ येथील नाक्यावरील नाका कामगार यांनी चांगले प्रदर्शन दाखवले त्यामुळे उत्तेजनार्थ पारितोषिक त्यांना देण्यात आले. विशेष सहभाग म्हणून आलेल्या ५ महिलांच्या टीम, कामगार नाका संघ, पथविक्रेता मार्केट संघ आणि नवीमुंबई आणि पनवेल येथील वेगवेगळ्या वस्त्यांमधून आलेल्या सर्व संघांना करंडक व सर्व सहभागीदार यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये लेबर हेल्पलाईन टीम, नवीमुंबई, पनवेल, वाशीनाका व इतर युवा साथी (अकाऊट व व्यवस्थापन) यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाची संकल्पना आणि तो यशस्वी पार पाडण्यामध्ये ॲड. सुजित निकाळजे यांनी विशेष कष्ट घेतले व सर्व सहभागी गरीब, कष्टकरी वर्गातील तरूण-तरुणी यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला.