संघर्ष, साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रवास
रोजच्या धावपळीत हा श्रमिक फक्त आपल्या पोटापाण्याचा विचार करत, मिळेल ते काम करत पुढे चालत राहतो; मात्र या संघर्षमय आयुष्यात तो स्वतःचे जगणेच विसरून जातो. या श्रमिकाला ना स्वतःचे हक्क माहीत असतात, ना त्या हक्कांसाठी लढण्याची संसाधने त्याच्याकडे असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून १९८४ पासून युवा ही संस्था वंचित लोकांना त्यांच्या हक्कांसाठी सक्षम बनवण्याचे कार्य करत आहे. प्रत्येकाला सन्मानाने, सुरक्षितपणे आणि शांततेत जगता यावे, यासाठी युवा सातत्याने प्रयत्नशील आहे.

कॉम्प्लेक्ससिटी ८.० हा महोत्सव लोकांना शहर घडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतो. सर्जनशील उपक्रमांद्वारे तो विविध पार्श्वभूमीतील लोकांना एकत्र आणतो आणि शहरातील लोकांच्या समस्या समजून घेण्यास मदत करतो. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला असंघटित कामगार साहित्य संमेलन हा उपक्रम कामगारांच्या कला आणि गुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही कॉम्प्लेक्ससिटी 8.0 अंतर्गत “असंघटित कामगार साहित्य संमेलन ४” हा उपक्रम ३० एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आला.
२०२३ पासून सुरू झालेल्या या साहित्य संमेलनाची २०२६ मधील संकल्पना “पर्यावरणीय आणि सामाजिक न्याय” या विषयावर आधारित होती. दरवर्षी हे संमेलन खारघर येथील युवा सेंटरमध्ये होत असे; मात्र यावर्षी ते वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात पार पडले. यंदाचे संमेलन अनेक अर्थांनी विशेष ठरले. सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ अंधश्रद्धा निर्मूलन समिती (ANiS) पनवेल यांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाचा इतिहास दर्शवणारे प्रदर्शन उभारण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये महाड चवदार तळे सत्याग्रह, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या शिक्षणासाठीच्या संघर्षांचा आढावा घेण्यात आला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराज ते नरेंद्र दाभोलकर यांच्यापर्यंतच्या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवासाचे दर्शन घडवण्यात आले होते. पुरोगामी आणि वैज्ञानिक विचारांचा वारसा अत्यंत सर्जनशील पद्धतीने मांडण्यात आला होता.
सभागृहात प्रवेश करताच मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती जाणवत होती. मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील अनेक कामगार आपल्या कुटुंबासह कार्यक्रमाला उपस्थित होते. रोजच्या कष्टांमधून आलेला थकवा विसरून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता.


क्रांतीगीतांनी रंगला कामगारांचा मेळावा :
कार्यक्रमाची सुरुवात युवा संस्थेच्या “गुंज – एक आवाज” या समूहांनी घेतलेल्या क्रांतीगीतांनी झाली. विजय, जयसिंग, विद्या, संगीता, शांता, अजय, सुकन्या, रितिका आणि राजू यांनी सादर केलेल्या गीतांनी वातावरण भारावून गेले. “जय जय महाराष्ट्र माझा” या गीताने कार्यक्रमाची सुरुवात होताच संपूर्ण सभागृहात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या सामूहिक वाचनानंतर उपस्थित मान्यवरांची ओळख करून देण्यात आली आणि युवाच्या साथींकडून त्यांचा सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

स्वागत समारंभानंतर युवाचे कार्यकर्ते तसेच उपस्थित मान्यवरांनी श्रमिकांचे प्रश्न आणि हवामान बदलाचा श्रमिकांवर होणारा परिणाम या विषयांवर आपले विचार मांडले. सर्वप्रथम युवाच्या कार्यकारी संचालक रोशनी नुगेहल्ली यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत आपल्या मनोगताला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, “कॉम्प्लेक्ससिटी अंतर्गत श्रमिकांच्या कला विविध माध्यमांतून पुढे यायला हव्यात. श्रमिकांच्या कथा आणि अनुभव त्यांच्या स्वतःच्या भाषेतून मांडण्यासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच हे संमेलन महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात व्हावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यानंतर युवा साथी दुलरी परमार यांनी “पर्यावरणीय न्याय, सामाजिक न्याय, लैंगिक न्याय, समता आणि बंधुता” या संमेलनाच्या संकल्पनेवर सविस्तर चर्चा केली. बदलत्या हवामानाचा असंघटित कामगारांच्या जीवनावर आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम त्यांनी अतिशय सोप्या आणि प्रभावी शब्दांत स्पष्ट केला. हवामान बदलामुळे सर्वाधिक परिणाम समाजातील वंचित आणि श्रमिक घटकांवर होत असल्याचे सांगत त्यांनी पर्यावरणीय न्याय आणि सामाजिक न्याय हे परस्परांशी घट्ट जोडलेले विषय असल्याचे अधोरेखित केले.

यानंतर युवा मध्ये असंघटित कामगार आणि महिला बचत गटांसोबत काम करणाऱ्या शांता ताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “तुम्ही स्वतःच्या प्रश्नांवर व्यक्त होऊन लिहायला सुरुवात केली, तर तेच साहित्य पुढची पिढी वाचेल आणि त्यातून घडेल. त्यामुळे आपण आपल्या भाषेत लिहिले आणि सादर केले पाहिजे.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थित कामगारांना स्वतःच्या अनुभवांना अभिव्यक्त करण्याची प्रेरणा दिली.
वक्त्यांचे मनोगत :

यानंतर युवा मध्ये असंघटित कामगार आणि महिला बचत गटांसोबत काम करणाऱ्या शांता ताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “तुम्ही स्वतःच्या प्रश्नांवर व्यक्त होऊन लिहायला सुरुवात केली, तर तेच साहित्य पुढची पिढी वाचेल आणि त्यातून घडेल. त्यामुळे आपण आपल्या भाषेत लिहिले आणि सादर केले पाहिजे.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थित कामगारांना स्वतःच्या अनुभवांना अभिव्यक्त करण्याची प्रेरणा दिली.

मा. संदेश कर्डक हे प्रसिद्ध मराठी शाहीर, कवी आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते वामनदादा कर्डक यांचे नातू, हे देखील कवी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी सामाजिक विषयांवर आधारित कविता लिहून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. ते शाहीर कवितेच्या माध्यमातून समाजजागृती करतात.
सामाजिक न्याय आणि साहित्य यांचा परस्परसंबंध स्पष्ट करताना म्हटले, “कोणतेही साहित्य संमेलन आणि सामाजिक न्यायाची गोष्ट करायची असेल, तर तुम्हाला फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांना वेगळे ठेवता येणार नाही.”
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारही कवितेच्या माध्यमातून मांडले. शेवटी त्यांनी जातीवर आधारित एक प्रेमकविता सादर करून आपले मनोगत समाप्त केले.

मा. मुक्ता कदम या स्वतंत्र पत्रकार आणि युट्युबर आहेत. त्यांनी बाबा साहेब आंबेडकर यांच्या काळातील वृत्तपत्रांविषयी माहिती दिली. त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक यांसारख्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपले विचार प्रभावीपणे कसे पोहोचवले. मूकनायक या वृत्तपत्रात बाबासाहेबांनी संत तुकारामांच्या अभंगांचा संदर्भ देऊन सामाजिक विचार मांडले.
त्या पुढे म्हणाल्या की “आज आपल्याकडे मोबाईल फोनसारखी आधुनिक साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे असे अनेक प्रश्न आहेत ज्यांना वाचा फोडण्याची गरज आहे आणि त्यासाठी युट्युब किंवा इतर सोशल माध्यमे प्रभावी ठरू शकतात.”
त्यांनी GDP, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या, कामगारांचे आंदोलन तसेच घरकाम करणाऱ्या महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन यावरही आपले विचार मांडले. त्यांच्या वेतनाबाबत तसेच कामगार कायदे आणि धोरण (Policy) याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

मा. ललिता धनवटे यांनी भटक्या-विमुक्त जमातींच्या जगण्यातील वास्तव, भटका समाज आणि त्यांच्या प्रश्नांना आत्मकथन स्वरूपात साहित्यात मांडले आहे. त्यांनी भटक्या-विमुक्त समाजाच्या साहित्य व कलेवर आपले विचार मांडले. तसेच त्यांनी असंघटित कामगारांचे अधिकार आणि विविध शासकीय योजनांबाबत भाष्य केले.
यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, “महाराष्ट्रातील संयुक्त लढ्यात आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये भटक्या-विमुक्त जातींचे प्रमाण संख्येने कमी असले, तरी प्रत्येक ठिकाणी त्यांचे अस्तित्व आढळते. त्यांनी आपल्या कला जोपासत साहित्य क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे.”
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हे विचार अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की जोपर्यंत आपण शिकणार नाही, तोपर्यंत आपली परिस्थिती बदलू शकत नाही; आणि परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण अत्यावश्यक आहे. त्यांनी महिलांना संघटित होण्यासाठीही मार्गदर्शन केले.
भटक्या-विमुक्त समाजाच्या जनगणनेतील समस्या त्यांनी मांडल्या. शेवटी त्या म्हणाल्या की असंघटित घटकांनी एकत्रितपणे संघटित व्हायला हवे, तसेच आपली कला, भाषा आणि सामाजिक परंपरा जपणे आवश्यक आहे.
त्यांनी YUVA संस्थेचे आभार मानले आणि असे नमूद केले की YUVA ही केवळ एक संस्था नसून विविध समूहांना एकत्र आणून साहित्य संमेलन आणि कामगार दिन साजरा करणारे एक व्यासपीठ आहे, याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले.

मा. मिनार पिंपळे हे संस्थापक असून विविध सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्थांमध्ये काम केले आहे. सध्या ते YouTube वर “UNMUTE” या नावाने पॉडकास्ट चालवत आहेत.
त्यांनी समाजव्यवस्थेबाबत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऐतिहासिक विचार मांडले. श्रमिकांबाबत विचार मांडताना त्यांनी नमूद केले की “असंघटित कामगार” या संज्ञेऐवजी “श्रमिक साहित्य आणि कला” अशा स्वरूपाचे संमेलन पुढे आयोजित केले पाहिजे.
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “जातिव्यवस्थेचे निर्मूलन” या पुस्तकातील अरुंधती रॉय यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेविषयीही आपले विचार मांडले. तसेच “UNMUTE” या पॉडकास्टबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, “ज्यांच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न होतो, त्या आवाजांना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी ‘UNMUTE’ हे एक व्यासपीठ आहे.”
ते पुढे म्हणाले की, “अशा प्रकारची संमेलने ही आपल्या आवाजाला मुक्त, बोलकी आणि प्रवाही बनवण्याची साधने आहेत, त्यामुळे या कलांकडे त्या दृष्टीने पाहिले पाहिजे.” त्यांनी जातीव्यवस्थेबाबतही आपले विचार मांडले.शेवटी त्यांनी दया पवार यांच्या “बाई, मी धरण बांधते” या कवितेच्या माध्यमातून पर्यावरणीय आणि सामाजिक आशय स्पष्ट केला.
असंघटित कामगार साहित्य संमेलन २०२६ पुस्तकाचे प्रकाशन :

या मार्गदर्शन सत्रादरम्यान असंघटित कामगार साहित्य संमेलन २०२६ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकामध्ये श्रमिकांच्या जीवनावर आधारित अनेक कविता आणि साहित्यिक लेखन समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच या पुस्तकातून श्रमिकांच्या आयुष्याचे विविध पैलू आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाचे चित्र प्रभावीपणे रेखाटण्यात आले आहे.
श्रमिक साहित्य आणि कलेतून सामाजिक परिवर्तनाचा संदेश :

यानंतर सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची उत्सुकता उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मुंबई आणि नवी मुंबई येथील विविध वस्त्यांमधून आलेल्या कलाकारांनी आपल्या भाषेत आणि विविध माध्यमांतून कला सादर केल्या. कविता, शाहीरी, कीर्तन, रॅप आणि नृत्य अशा विविध कलाप्रकारांमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.


सादरीकरण करणाऱ्या प्रत्येक गटाचे स्वागत करून त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले. टाळ्यांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थितांच्या जोश, आनंद आणि सहभागामुळे संपूर्ण सभागृह सकारात्मक उर्जेने भारून गेले होते. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

निष्कर्ष :
अशा प्रकारे, असंघटित कामगार साहित्य संमेलन ४ आणि कॉम्प्लेक्ससिटी ८.० या उपक्रमांनी श्रमिकांच्या आयुष्याला केवळ व्यासपीठच दिले नाही, तर त्यांना स्वतःचा आवाज, भावना व्यक्त करण्याची संधी आणि आत्मविश्वासही दिला.
श्रमिकांचे दैनंदिन संघर्ष, हक्कांची जाणीव आणि सामाजिक न्यायाची गरज या सर्व गोष्टी या संमेलनातून प्रभावीपणे पुढे आल्या. कला, साहित्य, संगीत आणि संवाद यांच्या माध्यमातून श्रमिकांच्या जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी निर्माण झाली.
युवा संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे वंचित घटकांना सक्षम करण्याचा आणि त्यांचा आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग अधिक मजबूत झाला आहे.असे दिसून येते कि श्रमिकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवण्यासाठी हे व्यासपीठ खूप महत्त्वाचे ठरले आहे.


