युवा कॉम्प्लेक्ससिटी अंतर्गत खारघर येथे आयोजित केलेल्या श्रमिक सांस्कृतिक साहित्य संमेलनाच्या मंचावर श्रमिकांनी व युवकांनी उत्स्फुर्तपणे आणि उत्साहाने आपल्या कला व संस्कृतीचे सादरीकरण केले.
युवा संस्था गेली ४० वर्षे असंघठीत क्षेत्रातील कामगारांसोबत त्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन देशभरामध्ये काम करीत आहे. यामध्ये नाक्यावर उभे राहणारे बांधकाम कामगार, पेंटर, फिटर, बिगारी, मिस्त्री आणि इतर क्षेत्रांमध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले, घरेलू कामगार अशा अनेक असंघटित क्षेत्रामध्ये विभागलेल्या कामगारांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचे शासकीय विविध योजनांमध्ये नोंदणी करून देणे, त्यांचे अस्तित्व निर्माण करून देणारी कागदपत्रे तयार करून देणे, सामाजिक सुरक्षा कायदा अंतर्गत त्यांना विविध कायदेविषयक मार्गदर्शन करणे, अशा अनेक प्रकारे संस्था या क्षेत्रातील लोकांसोबत जोडून त्यांच्यासोबत काम करीत आहे. हे करत असताना असंघठीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या सादरीकरनासाठी समतामंच उपलब्ध करून देत आहे. तसेच कॉम्प्लेक्ससिटी हा गेल्या ७ वर्षापासून युवा संस्थेने शहरांमधील वंचित भागामधून आलेल्या युवकांसाठी शहर निर्मितीमधील त्यांचे योगदान व शहराविषयींचे त्यांचे अनुभव एकमेकांना सांगण्यासाठीचा खुला मंच तयार केला आहे.
असंघटीत क्षेत्रातील कामगार आणि कामगारांच्या पोटी जन्माला आलेल्या युवकांनी लोकांच्या आयुष्यावर, मनावर खोल परिणाम करणारे साहित्याची निर्मिती कालही केली आहे आणि आजही निरंतरपणे करत आहेत. रस्त्यावर दगड फोडताना, इमारतीची लेवल मोजताना, भिंतींना लाली लावताना, घामांच्या धारांमध्ये आयुष्याचा सार शोधताना हे सर्व कष्टकरी, स्त्री-पुरुष कामगार वेगवेगळ्या चारोळ्या, नकला, गमती-जमती, कविता-कथा, भजन-भारुड, पोवाडा, गाणी, इत्यादी स्वरुपात विविध साहित्याची निर्मिती करत आहेत. त्यातूनच लोकांच्या तणावपूर्ण आयुष्यामध्ये हास्याचे क्षण घेऊन येणारे लोककलावंत आपली परंपरागत संस्कृती व कला जोपासत आहेत. म्हणूनच कामाच्या वेळेमध्ये छंद जोपासणाऱ्या या कामगार कलाकारांना स्वतःच्या हक्काचा मंच मिळावा म्हणून २०२३ सालापासून युवा संस्था “असंघटित कामगार साहित्य संमेलनाचे” आयोजन करत आहे. जे साहित्य महाराष्ट्रामध्ये लोककला म्हणून किंवा परंपरागत रुढींच्या माध्यमातून जपले जात आहे त्यालाही सादरीकरणासाठी स्वतःचा मंच मिळावा म्हणून “श्रमिक सांस्कृतिक साहित्य संमेलन २०२४” पर्व दुसरे चे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रगीत व प्रेरणादायी गीताने युवा साथी यांनी करून दिली, कार्यक्रमाचे उद्घाटन महापुरुषांच्या प्रतिमांना मानवंदना करून आणि संविधानाचे प्रास्ताविक सामुदायिक पद्धतीने वाचून करण्यात आली. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आणि युवा संस्थेच्या कार्यकारी संचालिका रोशनी नुग्गेहळ्ळी ह्यांनी प्रास्ताविक मांडताना सांगितले कि, कोविड-१९ च्या काळात लोकांच्या सोबत जवळून काम करत असताना लोकांच्या मध्ये असलेल्या कलागुणांना वाव देणे आवश्यक आहे असे प्रकर्षाने जाणवले. त्यांच्यातील उपजत कलागुणांना व साहित्यांना पुढे आणण्यासाठी व वाव देण्यासाठी गतवर्षी पहिल्यांदा श्रमिक सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षापासून हे श्रमिक सांस्कृतिक साहित्य संमेलन हे युवा संस्थेच्या कॉम्प्लेक्ससिटीचा भाग असणार आहे, असे त्यांनी सांगितले. या श्रमिक सांस्कृतिक साहित्य संमेलनाचा उद्देश हा शहरातील उपेक्षित कामगार व वस्त्यांमध्ये राहणारे तरुण यांना संस्कृतीची आणि साहित्याची जाणीव व्हावी आणि त्यांनी नव्या पद्धतीमध्ये साहित्याची निर्मिती करत राहावी जेणेकरून ते स्वतःच स्वतःचा आवाज बनू शकतील आणि स्वतःच्या पायावरती उभे राहतील, स्वतःची कथा स्वतः सांगू शकतील यासाठी हा खुला मंच आहे असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी या कलेला युवाच्या वेबसाईटवरून व युट्युब चॅनेल वरून प्रदर्शित आणि प्रसारित करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे उद्घाटनपर भाषण लोकशाहीर संभाजी भगत यांनी केले. “संस्कृती व साहित्य हे दोन्हीही मानवाला मिळालेली अनोखी व विशेष देणगी असून ती इतर प्राण्यांमध्ये नसते. माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावर विचार करतो आणि जो विचार करतो ते तो कृतीमध्ये आणतो. तो स्वत: बदलतो आणि जगाला बदलण्याची ताकद हि त्याच्यामध्ये असते. त्यामुळे माणसानेच हि संस्कृती निर्माण केली आहे. सध्या आजूबाजूला बिघडलेल्या संस्कृतीचे पाईक होऊ नका याउलट बुद्ध- छत्रपती शिवाजी महाराज- महात्मा ज्योतिबा फुले- डॉ. आंबेडकर ह्यांची संस्कृती आपलीशी करून तिचे आपल्या आयुष्यामध्ये पालन करा असे आवाहन त्यांनी केले”. आपले सुख दु:ख्ख वाटून घेवून लोकांनी एकत्रित येऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे मत प्रतिपादन केले तसेच तसेच त्यांनी साहित्य संमेलनाला शुभेच्छा देऊन त्यांनी त्यांच्या शैलीत “ये हिटलर के साथी जनाजो के बाराती” हे गाजलेलं गीत लोकांसमोर सादर केले.
घर हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष हिरामणदादा पगार यांनी लॉकडाऊन मध्ये असंघटित कामगार व झोपडपट्ट्यातील लोकांसाठी शासनाची दारे बंद होती त्यावेळी युवा संस्थेची दारे मात्र सर्व असंघटित कामगार व झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी खुली होती. कष्टकऱ्यांचे जीवन असुरक्षित आहे, ते सुरक्षित करण्याचे काम युवा संस्थेने केले. तसेच अशा प्रकारची साहित्य संमेलन सर्व ठिकाणी व्हायला हवीत ज्यामध्ये खऱ्या अर्थाने जो कष्टकरी वर्ग साहित्याची रचना करतो आणि ज्या कष्टकरी वर्गावर साहित्य निर्माण केले जाते यांचे मिश्रण होऊन हे साहित्य संमेलन आयोजन केले आहे त्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच प्रयास एक कोशिश या संस्थेचे आशिष शिगवण यांनी कामगारांना असंघटीत म्हणून ओळख देऊन त्यांना संघटीत होण्यापासून रोखले जाते असे सांगितले. जर आपण एकसंघ राहिलो नाही तर असंघटित कामगारांसाठी बनवलेल्या नीती व योजना लवकरच बंद केल्या जातील व पुन्हा गुलामीचे दिवस आपल्यावरती येतील यासाठी आपण सर्व कामगारांनी एकजुटीने कार्यरत राहावे व अशा साहित्य संमेलनामधून आपण स्वतः व्यक्त व्हावे असे आवाहन केले.
कार्यक्रमात विशेष पाहुण्या म्हणून ज्येष्ठ पत्रकार अलका धुपकर ह्यांनी बदलती संस्कृती आणि माध्यमे यांच्यामध्ये असंघटीत महिलांचे योगदान आणि आव्हाने ह्यावर भाष्य करताना मागील काही काळात माध्यमांचा स्तर बदलत असून त्यामध्ये संघर्षाचे प्रश्न कमी दिसतात आणि त्याच्यावरही इथल्या वर्चस्ववादी संस्था व व्यक्ती यांचा प्रभाव दिसत आहे, असे मत व्यक्त केले. त्यामुळे सामाजिक माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करून असंघटीत कामगारांचे प्रश्न मांडता येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. आपण सर्व कामगार यांनी छोट्या छोट्या रील बनवून, व्हिडिओ बनवून, कविता, चुटकुले, विनोद यांच्या माध्यमातून व्यक्त होणे गरजेचे आहे. जर आपण व्यक्त झालो नाही तर खोटा प्रचार व प्रसाराला बढावा मिळेल व असंघटित कामगारांची कहाणी त्याच्यामध्ये दबली जाईल याविषयी भाष्य केले. त्याच बरोबर येत्या काळात श्रमिकांचे स्टँडअप कॉमेडी संमेलन भरवता येऊ शकेल आणि त्यातून सुद्धा प्रश्नांना वाचा फोडता येईल. तसेच स्वत:चा आवाज स्वत:च बनण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.
या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष लोककला गायक व अभ्यासक अविनाश कदम यांनी संस्कृतीचे व साहित्याचे स्वरूप बदलत चालले आहे. जागतिकीकरणानंतर बाजारीकरण आले. संस्कृती बदलली. पैशाचा प्रभाव वाढला. आपण दुसर्या क्रमांकाचा श्रीमंत देश बनणार आहे अस म्हणतात पण त्यापैकी किती संपत्ती कष्टकरयांकडे आली? गरिबांचे जीवनमान उंचावले का? टीव्ही वर दिसणाऱ्या गोष्टींचे युवकांना आकर्षण वाटू लागले. पण त्या मिळत नसल्यामुळे निराशा आली. आत्महत्त्या वाढल्या. द्वेष, नफरत, धर्म, जात, पंथ याबद्दल खोटा अभिमान व स्वाभिमान बाळगणे व पसरविणे याचे काम सत्ताधारी अथकपणे करत आहेत त्यामुळे आपण या संस्कृतीला तीलांजली देऊन नवी स्वातंत्र्य, समता व बंधुता याची संस्कृती वाढवली व जोपासली पाहिजे. असे केले नाही तर हळूहळू बंधुता नष्ट होऊन मानवाचे स्वातंत्र्य तो गमावून बसेल आणि स्वतंत्र गमावल्यानंतर समता प्रस्थापित होणार नाही हे असंघटित कामगार व युवक यांनी लक्षात घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. लोकशाहीर आप्पासाहेब उगले, युवा शाहीर रामानंद उगले आणि त्यांच्या टीमच्या वतीने पोवाडे, भारुड, वासुदेव, सामाजिक चळवळीच्या गीतांनी उपस्थित कामगार व युवकांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण केली. या संमेलनात कबीरा फौंडेशन यांच्या तर्फे वस्तीतल्या मुलांच्या सहभागातून भोवतालच्या परिस्थितीवर विनोदी पद्धतीने भाष्य करणारे “अंधेर नगरी चौपट राजा” हे नाटक सादर केले.
या श्रमिक सांस्कृतिक साहित्य संमेलनामध्ये अनेक श्रमिक कामगारांनी तसेच युवकांनी आपली कला सादर केली. शोभा गवई, गायत्री पाटेकर, संगीता गायकवाड, रविना जाधव यांनी भीमगीते सादर केली. रंजना बागडे यांनी ऐसा खत में लिखो हि कविता सादर केली. मालवणी येथील घरकामगार महिलांनी लेझीम नृत्य सादर केले. सुगंधा गुंजाळ या युवतीने “ऐसे दस्तुर को” आणि स्वराली देशमुख हिने “जय जय महाराष्ट्र माझा”हे सुंदर गीत गायले. साई वाघमारे, मेरी आणि बुद्धराज या तरुणानी रॅप या आधुनिक गीतप्रकारातून वंचित, उपेक्षितांचे जीवन मांडले. अजय बोरकर, भैय्यासाहेब आठवले, सतिश लोंढे आणि विजय खरात यांनी कविता सादर केली. अनिल चव्हाण व राजरत्न म्हस्के या बांधकाम कामगार यांनी बुलबुल व ढोलकी हे वाद्य वाजवून आपली कला सादर केली, तसेच अवनी गायकवाड हिने नृत्य सादर केले.
या संमेलनाची सांगता करताना राजूदादा वंजारे यांनी काम करता करता आपण आपली कला जोपासावी त्यांना वेगवेगळे सादरीकरणाचे माध्यम युवा संस्था आपल्याला उपलब्ध करून देईल असे प्रतिपादन केले. सचिन नाचणेकर यांनी लोकशाही जागृतीपर कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. सुजित निकाळजे व विद्या रामूगडे यांनी केले.
या संमेलनाला शेकडो नाका कामगार, बांधकाम मजूर, फेरीवाले, घरकामगार महिला आणि वस्त्यांमधील शेकडो युवक उपस्थित राहिले त्यांनी कलाकारांना प्रोत्साहन दिले आणि कार्यक्रमातून प्रोस्ताहन घेतले. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध साहित्यिक, लेखक, कथा-कादंबरीकार, कवी, एकपात्री नाटककार, तसेच सामाजिक विषय घेऊन सोशल मिडीयावर मत आणि चित्रफिती दाखवणारे कलावंत यांनी उपस्थिती दाखवली. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक ३० एप्रिल २०२४, रोजी युवा सेंटर, सेक्टर ७, खारघर, नवी मुंबई या ठिकाणी संपन्न झाला.