दि. 12 ऑगस्ट 2018 रोजी जागतिक युवा दिनानिमित्त आज छात्रभारती व अनुभव शिक्षा केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यामाने ‘युवा व समाज’ या विषयावर चर्चासत्र घडवून आणण्यात आले. या चर्चासत्रामध्ये पुढील मुद्दे मांडण्यात आले.
- युवक आणि समाज यातील दरी मिटवण्यासाठी स्वभान आणि समाजभान यातील परस्पर संबंध समजून घेऊन पाऊले उचलावी.
- समाज माध्यमांचा योग्य वापर करायला हवा तसेच वाचन वाढवायला हवे
- राजकारणाला बळी न पडता स्वतःचा विचार निर्माण करायला हवा.
- युवकांच्या विचारात जातील थारा न देता समानता यायला हवी.
- युवतींना चळवळीच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न वाढवायला हवे.
- सरकारने शिक्षण आणि आरोग्य या दोन घटकावर जास्त खर्च करायला हवे.
- युवकांनी परिवर्तनाची सुरवात स्वतःपासून आणि कुटुंबापासून करावी.
यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. युवा नेहमी विचाराने युवा हवा वयाने नाही असे मत साथी मंगेश निकम यांनी मांडले.
चर्चासत्रानंतर उपस्थित सभासदांचे चार गट करण्यात आले व पुढील चार विषयावर गटप्रदर्शन करण्यात आले.
- युवा व सोशल मीडिया
- युवा व स्त्री पुरुष समानता
- युवा आणि समाजभान
- युवा आणि निवडणुका
प्रत्येक गटाने आपापल्या विषयावर गटप्रदर्शन केले. अशाप्रकारे उपस्थित युवानी समानता, स्वातंत्र व लोकशाही हे हत्यार सोबत घेऊन विज्ञानवादी मार्गाने चालण्याचा निर्धार करून हा दिवस साजरा करण्यात आला. या वेळी राकेश पवार, सागर निकम, सचिन भुसारे, राम सूर्यवंशी, निवृत्ती खेताडे, सदाशिव गणगे, श्रद्धा कापडणे, मारुती नेटावणे, मोहित गोवेकर, देविदास हजारे, रोशन बोराडे, अनुराग कडेकर, वृषाली गोवेकर यासह अनेक सहभागी उपस्थित होते.
Nitin Mate, Programme Coordinator
दिनांक 12 ऑगस्ट हा आंतराष्ट्रीय युवा दिन आहे, या दिनाच्या निमित्ताने युवा संस्थेच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक विभागातील युवक युवतींनी एकत्र येऊन हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला.
मुंबईतील परेल, बांद्रा, विलेपार्ले, चारकोप, कांदिवली, जोगेश्वरी, मालाड-मालवणी, मानखुर्द तसेच नवी मुंबईत बेलापूर टाटा नगर, पंचशील नगर इत्यादी विभागातील युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग दर्शवला. या दरम्यान युवांनी खेळाच्या माध्यमातून, पथनाट्या च्या माध्यमातून, वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून तसेच चर्चा- परिसंवादाच्या माध्यमातून एकत्र येऊन हे उपक्रम राबवले, मुख्यतः आंतराष्ट्रीय युथ डे च्या निमित्ताने क्लेमिंग स्पेस आणि सेफ प्लेस ची भुमिका घेऊन हा दिन साजरा केला जातोय. मुबंई-नवी मुंबई मध्ये युथ साठी मोकळ्या जागा, मैदाने फार कमी राहिली आहेत,किंबहुना युथ साठी अभिव्यक्तीच्या दृष्टीने अशा काही जागा राहिल्याच नाहीत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, आणि त्याचप्रमाणे सुरक्षित जागांचा मुद्दा ही गंभीर आहे अशा वेळी एकूण सर्वांगीण विकासाकरिता तसेच युथ ला एकत्रित आणण्याकरिता, त्यांना आपली मते, भुमिका मांडण्याकरिता त्यांच्या हक्काच्या जागा असायला हव्यात ही भूमिका घेऊन युथ काही सार्वजनिक जागांवर क्लेम करत आहेत , त्यातूनच *क्लेमिंग स्पेस* हे अभियान सुरू झाले आहे. मुंबईतील अनेक वस्त्यांमधून युथ एकत्र येऊन *क्लेमिंग स्पेस आणि सेफ प्लेस* हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवत आहेत. आंतरराष्ट्रीय युथ दिन साजरा करण्यामागेसुद्धा हीच भूमिका आहे.
याच युथ दिनाच्या निमित्ताने सायंकाळी मुंबई — नवी मुंबईतील युवक युवतींनी गोरेगाव सेंट पायस इथे मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन युवा दिन जल्लोषात साजरा केला, त्यावेळी उपस्थित युवक युवतींना मार्गदर्शन करण्यासाठी मा. विद्याताई चव्हाण, साथी मोहनदादा चव्हाण, सकाळ चे पत्रकार साथी निसार अली इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्याचप्रमाणे युवा संस्थेचे कार्यकारी संचालक साथी रोशनी नूगहल्ली, युवा साथी सचिन नाचनेकर, पुजा यादव, युवक युवतींचे प्रतिनिधी म्हणून प्रतीक्षा थत्ते आणि बाळा आखाडे ही उपस्थित होते. यावेळी या मान्यवरांनी उपस्थित युवांसोबत संवाद साधला, युवा जल्लोष या विचारमंचावरून मार्गदर्शन करताना दै.सकाळचे पत्रकार साथी निसार अली यांनी प्रामुख्याने वस्तीपातळीवरील घडणाऱ्या युवकांच्या संदर्भातील प्रकरणांचा उल्लेख केला, युवा म्हणून आपण यात हस्तक्षेप करायला हवा, आपल्या वस्त्या सुरक्षित बनण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे हे त्यांनी नमूद केले. मा. विद्याताई चव्हाण यांनी एकूणच देशभरात घडणाऱ्या घटनांचा उल्लेख करून उपस्थित युवक युवतींना हे आवाहन केले की देशाची लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ही लोकशाही टिकवून ठेवणे आणि घटनेचे संरक्षण करणे, युवकांनी यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज त्यांनी नमूद केली. युवा प्रतिनिधी प्रतीक्षा थत्ते हिने वस्तीतील युवाचे प्रश्न आणि त्यात युवा प्रतिनिधी म्हणून राहिलेला हस्तक्षेप मांडला, बाळा आखाडे याने मालवणी युवा परिषद आणि अनुभव शिक्षा केंद्र याबाबत माहिती दिली. युवा संस्थेच्या कार्यकारी संचालक साथी रोशनी नुगहल्ली यांनी सेफ प्लेस व क्लेमिंग स्पेस बाबत युवा संस्थेची भूमिका मांडली. त्याचप्रमाणे युवा संस्थेचे प्रतिनिधी साथी सचिन नाचनेकर यांनी आजच्या आंतराष्ट्रीय युवा दिनाची भुमिका सांगितली तसेच युवा संस्था म्हणून क्लेमिंग स्पेस व सेफ प्लेस तसेच युवा धोरणाच्या संदर्भात आत्तापर्यंत राबवण्यात आलेली प्रक्रिया मांडली तसेच संस्थेने बनवलेल्या युवा धोरणाचा ड्राफ्ट बाबत माहिती देऊन मा. विद्याताई चव्हाण यांना विनंती केली की त्यांनी या ड्राफ्टवर नक्कीच विचार करावा आणि येत्या काळात सदानामध्ये याबाबत मुद्दा उपस्थित करावा, त्यांनी तो मान्य केला. याबाबत लवकरच युवा संस्थाचे प्रतिनिधी व विद्याताई एकत्रितपणे येऊन याबाबत पुढील नियोजन ठरवणार आहेत. या युवा जल्लोष कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विभागातून आलेल्या युवक युवतींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, गुंज एक आवाज या कला पथकाने जनजागृती गीते घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा यादव यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान साथी मोहनदादा चव्हाण यांनी भूषवले. या युवा जल्लोष कार्यक्रमात मुंबई- नवी मुंबई विभागातील 350 च्या आसपास युवक युवती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस साथी सचिन यांनी युवा समोरील असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाईल असे नमूद करून उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा संस्थेच्या सर्व साथींनी मोट्या प्रमाणात आपले योगदान दिले.
Vijay Kharat, Project Coordinator
राष्ट्राची ताकद म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, लाथ मारील तिथे पाणी काढण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे; त्या युवा शक्तीचा १२ ऑगस्ट २०१८ हा दिवस होता. युवा या शब्दाचा उलट शब्द केला तर तो होतो वायू … म्हणजेच वायूच्या गतीने/वेगाने पुढे सरकणारा युवक काल मोठ्या संख्येने आंतरराष्ट्रीय युवक दिनासाठी उपस्थित राहिला होता. युवा संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आलेला हा दिवस केवळ एक युवक दीन म्हणून बिलकुल साजरा झाला नाही, तर हा दिवस साजरा केला गेला एका विशिष्ट संकल्पनेसह. जिथे युवक एकत्रित येऊन स्वतःच्या विचारांची आदान — प्रदान करत होते. विचारांची देवाण — घेवाण करत असताना युवकांनी घटनात्मक हक्कांची मांडणी सुद्घा मुद्देसूदपणे केली. विचारांचे एक व्यासपीठ युवकांना मिळवून देऊन, त्यातून एक विचार विनिमय घडून यावी म्हणून कालचा दिवस खूपच महत्त्व पूर्ण ठरला. खरं तर *क्लेमिंग स्पेस आणि सेफ स्पेस* याला घेऊन आपल्या युवा साथिंची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, कारण काल सकाळी आपण सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी समुदायात जे उपक्रम घेतले ते सर्व उपक्रम न्याय, हक्क, समानता, बंधुता, सुरक्षितता याची जाणीव करून देत होते. एक सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी युवकांनी देशात घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर विचार केला पाहिजे, आणि केवळ विचार न करता त्या गोष्टी बदलण्यासाठी काही पाऊले आप — आपल्या स्तरावर उचलली पाहिजेत. असे मत, *महाराष्ट्र राज्य, विधानपरिषद, आमदार विद्याताई चव्हाण* यांनी मांडले.
सांस्कृतिक कार्यक्रमात. तुफानी शब्दांत रचलेल्या क्रांतिकारी गाण्यांच्या मैफिलीतून. एक परिवर्तनवादी विचार गुंज एक आवाज ने. दिला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
खरं तर एका विचारांची माणसं एकत्रित आली तर मोठी क्रांती घडते असे मी फार वेळा ऐकले आहे.परंतु वेगवेगळ्या विचारांची माणसं एकत्रित येऊन एक सुंदर विचार निर्माण करणारी अनेक माणसं काल मी एकत्रित पाहिली.
खरं तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी खूप मेहनत घेतली. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद! जिंदाबाद!
Namdeo Guldagad, Project Associate