बाल गुलाम! होय बाल गुलाम तुम्ही बरोबर वाचलं आहे ,बाल गुलाम हा शब्द ऐकल्यावर काय वाटत? चिड येते का ? हो चिड आलीच पाहिजे . शोषण करणाऱ्या व्यवस्थेत काम करणारी ही मुलं एक प्रकारे गुलाम आहेत. ही गुलाम मुलं आपल्याला कुठे दिसतात? ही गुलाम आपल्याला चहाची टपरी,रेल्वे स्टेशन,सिग्नल, लोकल ट्रेन,सोसायटी मध्ये घर काम करताना, दुकाने ,कारखाना इत्यादी ठिकाणी फुगे,गजरे विकताना,पुस्तक विकताना, कधी बूट पॉलिश करताना तर कधी पेपर टाकताना,आपल्या आवती-भोवती काम करताना दिसतात. पण आपण त्यांच्याकडे गांभिर्याने बघत नाही. कारण आपण त्यांना बाल कामगार म्हणुन स्विकारतो.
बाल कामगार म्हटले की त्यात जास्त विचार नाही करावा लागत, तो आपण नेहमी वाचत असतो, ऐकत असतो आणि हो,बघत ही असतो, कारण त्यात नवीन काही नाही. त्यात त्यांच्या वेदना ,शोषण जाणवत नाही.
बाल — कामगार हा शब्द एक प्रकारे सामाजिक मान्यताच देतो. म्हणजे अशी व्यवस्था जिथे मुलं काम करू शकतात, ज्यात विशेष विचार करण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही.हा शब्द ऐकल्यावर चिड येत नाही.एकीकडे आपण मुलांना देशाचे भविष्य म्हणुन संबोधतो आणि वास्तव काय आहे तर वर्तमानात मात्र देशाचे भविष्य असुरक्षित ,वेदनेत,चाचपडत/धडपडत जीवनाशी संघर्ष करत अंधारात लोटले जात आहे.
देशाचे भविष्य अशा व्यवस्थेत अडकलयं जिथे मोठ्यांना काम नाही,पण कमी पगारात जास्तीचं काम करण्यासाठी मुलांना वापरले जाते.या व्यवस्थेत शारीरिक, मानसिक,लैंगिक आणि आर्थिक शोषणांचे बळी पडणारी ही मुलं कामगार आहेत की गुलाम ? या गुलामांचे ज्या वयात खेळण्याचे, शिक्षणांचे वय आहे. त्या वयात या मुलांना शोषण व्यवस्थेत ढकले जात आहे . मग ही गुलामी नाही तर दुसरे काय आहे.
एकीकडे मोठ्यांना नोकरी नाही आणि लहान मुलांना मात्र सहज कामावर ठेवले जात आहे.कारण कमी पगारात जास्तीचे काम मुलांकडून करवून घेणे मालकाच्या हिताचे असते आणि मुलांचे शोषण करणे सोपं असते. या शोषण व्यवस्थेत मुलं मोठ्या प्रमाणात ओढली जात आहेत.
शहरात काम करणाऱ्या मुलांना जेव्हा बघतो तेव्हा असे आढळुन येते कि ९० टक्के मुलं ही दुसऱ्या राज्यातुन, ईतर जिल्हातुन शहरात काम करण्यासाठी आणली जातात.पण कोविड च्या या काळात दुसऱ्या राज्यातुन,जिल्हातुन आलेली ही मुलं लॉकडाऊन मुळे आपल्या गावी परत गेलीत. त्यांच्या जागी स्थानिक मुलं, जी शाळा बंद असल्यामुळे तसेच आँनलाईन शिक्षण असल्यामुळे सोयसुविधांचा अभाव तसेच मुलं बिघडू नये,आपल्या डोळ्यासमोर राहावीत या कारणांमुळे मुलं घरातील लहान भावंड यांना सांभाळणे,पालकांसोबत कचरा वेचणे,भाजीपाला व दुकानात अश्या इतर कौटुंबिक व्यवसायात मुलं मोठ्या प्रमाणात काम करताना दिसून येत आहेत, तसेच चहाची टपरी, हाँटेल, लोकल ट्रेन मध्ये सामान विकताना इत्यादि ठिकाणी आपण रोज बघतो. मात्र अशी ही काही मुल आहेत जी आपल्याला सहज दिसत नाहीत पण त्यांनी बनविलेल्या वस्तुंचा आपण सरास वापर करत असतो. ही मुल बिडी /फटाके बनविणे असो किंवा जरी काम अशा सर्वचं उद्योगात ही मुलं १६-१६ तास काम करत असतात. या कामात अनेक मुलांनी आपला जीव ही गमवला आहे.तरी आपल्याला काही फरक पडत नाही.कारण आपण त्यांना कामगार म्हणुनच स्विकारतो, इतकी असंवेदनशीलता मुलांच्या प्रती दिसुन येते. येणाऱ्या काळात बाहेरून काम करण्यासाठी आणल्या जाणाऱ्या मुलांपेक्षा स्थानिक मुलांचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुलं इतर राज्यातील असो किंवा स्थानिक, मुद्दा तोचं आहे फक्त स्वरूप बदलत आहे.
यासाठी जबाबदार कोण आहे? आपल्या देशातील मुलांसंदर्भातील कायदे ज्या मध्ये एक वाक्यता नाही.बाल कामगार विरोधी कायदा हा मुलां मध्ये दोन गट पाडतो.एक १४ वर्षा आतील मुलं आणि १४ वर्षावरीलं मुलं अशी विभागणी करतो. मुलांच्या हक्काच्या संहितेत मुलं म्हणजे १८ वर्ष पर्यंत ची व्यक्ती म्हणजे मुलं असे म्हटले आहे. यानुसार १८ वर्षाच्या आतील मुलांवर होणाऱ्या सर्व प्रकारच्या शोषणांपासुन संरक्षणांकरिता एक कायदा तयार करणे गरचे आहे.
बाल मजुरी विरोधी अभियान ( CACL) हे राष्ट्रीय स्तरावरील नेटवर्क आहे. संपूर्ण बालमजुरी नष्ट झाली पाहिजे या उद्देशाने अभियान कार्य करत आहे. जिथे मुलांच्या अधिकारांचे हनन होत आहे. तिथे सक्रियपणे या अभियानाद्वारे हस्तक्षेप करण्यात येत आहे. २९ राज्यांमध्ये हे नेटवर्क अस्तित्वात आहे.महाराष्ट्रात ही ३६ जिल्ह्यात या अभियानाचे कार्य सुरू आहे.
समाज म्हणुन ही आपली मोठी जबाबदारी आहे. समाजाचा एक भाग म्हणुन ज्या वयात मुलांनी खेळावं ,शिकावं,बागडावं त्या वयात मुलांचे बालपण हेरावुन त्यांना गुलाम बनविणाऱ्या या शोषण व्यवस्थेत काम करणाऱ्या मुलांना बाल कामगार म्हणुन न संबोधता ते मालक वर्ग तसेचं शोषण व्यवस्थेचे चे गुलाम आहेत.या गुलामांना स्वतंत्र मिळवुन देण्यासाठी आपल्यात चिड निर्माण झाली पाहिजे. तरच या मुलांना गुलामीतुन खरं स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी या शोषण व्यवस्थे विरूद्ध आपण उभ राहू शकतो. यासाठी आपण काय करू शकतो?तर आपण मुलं काम करीत असलेल्या चहा ची टपरी,हाँटेल अशा ठिकाणी जाण्याचे टाळणे, मूल काम करत असलेल्या ठिकाणी तेथील मालकाला मुलाला कामावर ठेवल्यामुळे त्यांच्या कडून कोणती ही वस्तु खरेदी न करता किंवा त्यांची सेवा नाकारत आहोत याची जाणीव मालकाला करुन दिली पाहिजे. मुलांचा वापर करुन बनविलेल्या वस्तुंचा बहिष्कार करणे आणि कुठेही मुलं काम करताना दिसुन येत असेन तर चाईल्ड लाईन-१०९८ या हेल्प लाइन वर फोन करून त्याबदल माहिती देणे. शासनाच्या पेन्सिल पोर्टल वर काम करणाऱ्या मुलांची नोंद करणे तसेच मुलांच्या संरक्षणाकरिता नगसरसेवक स्तरावर बाल संरक्षण समिती गठीत करुन त्या समितीने सक्रीय काम करावं असा आग्रह करून किमान आपला वार्ड हा बाल-गुलाम (कामगार) मुक्त आणि बाल प्रेमी वार्ड म्हणुन घोषीत करू शकतो त्यासाठी प्रयत्न करणे.
तर चला मग उद्याच्या भविष्याला आज वर्तमानात सुरक्षित करुया
प्रकाश भवरे